पिंपरी : निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. महापालिका निवडणूक नऊ वर्षांनी जाहीर झाल्याने आताच कंठ फुटल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मी भाजपवर टीका केली नसून चुका सांगत असल्याचेही अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे हमीपत्र रविवारी प्रसिद्ध केले. या वेळी ते बोलत होते. भाजपने २०१७ मध्ये २७ आश्वासने दिली होती. त्यातील एकही पूर्ण केले नाही. मी भाजपवर टीका केली नाही. महापालिकेतील चुका सांगत आहे. चुका सांगणे म्हणजे टीका करणे नव्हे. निवडणूक नऊ वर्षांनी जाहीर झाल्याने आताच कंठ फुटला आहे, असे म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन (एसआरए) प्रकल्पाची निवडणुकीनंतर चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले. खरंच झोपड्या होत्या का, केवळ टीडीआर लाटला. भोसरी, रावेत, पिंपरी-चिंचवडमध्ये जिथे एसआरएचे काम चालू आहे. या सर्वांची चौकशी करावी. माझा पाठिंबा आहे. दूध का दूध पानी का पानी होईल.
लीडर की डीलर?
नेतृत्व लीडर की डीलरच्या हातात द्यायचे आहे, हे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी ठरवावे. डीलर कोण आहे हे शहरातील नागरिकांना माहिती आहे. मी केलेल्या आरोपांचे उत्तर भाजपने का दिले नाही. भोसरीतील ७० लाखांचा उड्डाणपूल सात कोटींवर कसा गेला, याचे उत्तर द्यावे, असेही अजित पवार म्हणाले.
काय आहे अजितदादांचे हमीपत्र?
‘पिंपरी-चिंचवड शहरातील पाचशे चौरस फुटाच्या घरांना मालमत्ताकर माफी, विकास आराखडा (डीपी) रद्द करणे आणि दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हमीपत्र रविवारी प्रसिद्ध करण्यात आले. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही पीएमपी, मेट्रोचा प्रवास विनामूल्य केला जाईल. न
ळाद्वारे रोज पाणी, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी, टँकरमुक्त, खड्डेमुक्त, वाहतूक कोंडी, प्रदूषण मुक्त शहर, स्वच्छता अभियानात भारतात प्रथम स्थान, अत्याधुनिक आरोग्य सुविधा, मॉडेल स्कूल, विद्यार्थ्यांना मोफत टॅब, रस्त्यांचे जाळे वाढविण्याची हमी पवार यांनी दिली. सत्ता येताच या सर्व आश्वासनांची मी पूर्तता करणार हा अजितदादाचा वादा आहे. हे हमीपत्र कागदावर राहणार नसून शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे. जागतिक दर्जाचे शहर केले जाईल, असेही ते म्हणाले.
