दिवसभरात काय-काय घडले ?

बारामती : बारामतीत विमान कोसळून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पवार यांच्या पार्थिवावर आज (२९ जानेवारी) सकाळी अकरा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा या गावात अजितदादांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केले. मात्र, सकाळी पावणे नऊच्या सुमारास हे विमान उतरण्याच्या तयारीत असतानाच धावपट्टीजवळ कोसळले. खाली कोसळताच विमानाने पेट घेतला. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अजित दादांवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी बारामतीकडे जाण्यासाठी रीघ लावली. अजित पवार यांचे पार्थिव ठेवण्यात आलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी गर्दी केली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्य इमारतीत ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सांत्वन केले.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजारापू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दादा भुसे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यासह राज्याच्या विविध भागांतील लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, वरिष्ठ प्रशासकीय-पोलीस अधिकाऱ्यांनी पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, हसन मुश्रीफ आदी नेत्यांनी शोक व्यक्त केला.

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात २८ ते ३० जानेवारी दरम्यान दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज सकाळी अकरा वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार आहेत.

घटनाक्रम

– सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा या गावात अजितदादांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते.

– पायलटचा पहिला लँडिंग प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी विमानाला रनवे ११ वर उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर पायलटकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. अवघ्या एका मिनिटानंतर, म्हणजेच सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी एटीसीला रनवेजवळ आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या, अशी माहिती डीजीसीएकडून देण्यात आली.

– अजित पवारांना घेऊन येणारे विमान बारामतीजवळ पोहोचले होते. विमानतळावर उतरण्याआधी या विमानाने आकाशात गोल फेरी मारली. मात्र, काही क्षणात विमान कोसळताना दिसले. मोठा स्फोट झाला आणि अजित पवार यांचा मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचे दिसले,’ अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

शेवटच्या क्षणापर्यंत कामात गर्क

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सतत कामात गर्क असायचे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत ते सतत कामात व्यस्त असत. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा दरारा असायचा. विमान दुर्घटना घडलेल्या ठिकाणी कागदपत्रे पडली होती. त्यावरून शेवटच्या क्षणापर्यंत अजित पवार हे कामात व्यस्त असल्याचे दिसून आले.

 ‘हा अपघात; राजकारण आणू नये

‘अजित पवारांचे जाणे हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला आज महाराष्ट्र मुकला. जे काही नुकसान झाले ते भरून निघणारे नाही; पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात, असे नसते. या अपघाताच्या मागे राजकारण आहे, अशी भूमिका काहींनी मांडली. मात्र, याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. या अपघाताच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सर्वांना बसत आहेत. कृपा करून इथे राजकारण आणू नये,’ अशी भावनिक साद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घातली.

हवाई दलाकडून आपत्कालीन सुविधामहाराष्ट्र शासनाने केलेल्या तातडीच्या विनंतीवरून भारतीय हवाई दलाने त्वरित कारवाई करत लोहगाव येथील हवाई दल तळावरून हवाई वाहतूक नियंत्रण (एअर ट्रॅफिक कंट्रोल) कर्मचाऱ्यांचे एक पथक, तसेच आवश्यक तांत्रिक उपकरणे बारामती विमानतळावर पाठवली. या पथकाने स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने संपर्क व्यवस्था, तसेच अन्य आपत्कालीन सुविधा उभारून तातडीने आपत्कालीन हवाई वाहतूक नियंत्रण सेवा सुरू केल्या. त्यामुळे हवाई वाहतुकीचे सुरक्षित आणि कार्यक्षम व्यवस्थापन करता आले, अशी माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली.