पुणे : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा बारामती या बालेकिल्ल्यातच पराभव झाला. यानंतर ‘एक्स’ या समाज माध्यमावरील ट्रेंडमध्ये अजित पवार यांचे स्थान मंगळवारी दिवसभर कायम राहिले.

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेची एकमेव जागा मिळाली. रायगड मतदारसंघात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विजयी झाल्याने पक्षाने खाते खोलले. मात्र, अजित पवार यांच्या बारामती या बालेकिल्ल्यातच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. यामुळे त्यांच्या नावाचा संदर्भ देऊन ‘एक्स’वर पोस्ट टाकण्याचे प्रमाण वाढले. अनेक जणांनी त्यांना ट्रोल केले. तसेच, भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा समाचार घेतला. त्यामुळे ते ट्रेंडमध्ये कायम राहिले.

हेही वाचा >>> “केवळ दादाच असतील, इतर सगळे…”; अजित पवारांवर रोहित पवारांची मिश्किल टीका

अजित पवार हे ट्रेंडमध्ये असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही ट्रेंडमध्ये होते. याचवेळी महाराष्ट्र हा ट्रेंडही सुरू होता. या ट्रेंडमध्ये राज्यातील परिस्थितीवर अनेक जणांनी परखड भाष्य करीत चिमटे काढले. राज्यातील लोकसभा निकालावर टिप्पणी करीत अनेकांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडेही काढले.

समीर विद्वांस यांचा निशाणा

चित्रपट दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी निकालावर ‘एक्स’वर पोस्ट केली. त्यात म्हटले की, सुप्रियाताई विजयी झाल्या. माझे मत वाया गेले नाही, याचा मला आनंद आहे. सरकार कोणाचेही येवो परंतु, कोणीही अजेय नसतोच. अहंकार खूप सहज आणि खूप जास्त वर घेऊन जातो, परंतु ते कशासाठी तर तितक्याच वरून जोरात खाली आपटण्यासाठी !