पिंपरी : उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस जड अंतकरणाचा आहे. अजितदादा मला माफ करा, अशा शब्दांत भाजप आमदार महेश लांडगे यांनी माफी मागितली. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार लांडगे यांनी त्यांची माफी मागितली आहे. चिंचवड येथे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व पक्षीय, सामाजिक संघटना, संस्था यांच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लांडगे बोलत होते.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, ‘अजितदादांच्या अनेक आठवणी आहेत. कोणतेही काम असले तरी अजित पवार करायचे’. नगरसेवक शेखर चिंचवडे म्हणाले, ‘अजित पवार यांनी मला एबी फॉर्म दिल्याने आज मी नगरसेवक आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी २३ वर्ष काम केल. मात्र अजित पवारांना २३ दिवस देखील देऊ शकलो नाही. कामातून त्यांच्यासोबत राहील’. माजी महापौर संजोग वाघेरे म्हणाले, ‘सुरुवातीपासून मला अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. वेगवेळ्या पदावर काम करता आले. शहरातील मोठ मोठे उड्डाणपूल त्यांनी निर्माण केले’.
मागासवर्ग आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे म्हणाले, ‘फुले शाहू आंबेडकर विचारांचा समक्ष साक्षीदार आम्ही गमावला आहे’. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट म्हणाल्या, ‘अजित पवारांच्या शोकसभेला सर्वांना बोलवावं अस वाटत नव्हते. सुनेत्रा पवार यांचा चेहरा पाहिल्यानंतर अनेक मन पिळवटून निघत आहे. त्यांच्या कुटुंबामागे उभे राहून खंबीर पाठिंबा देणे हीच आदरांजली आहे’.
नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, ‘अजित पवार यांच्या शोकसभेला यावे लागेल असे वाटल नव्हते. मेट्रो आणि बस फ्री करावी हीच त्यांना आदरांजली. अजित पवारांचे स्मारक उभे करण्यात येईल’. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे म्हणाले, ‘कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला मोठे पद मिळाले. शहरातील सगळ्या नेत्यांनी मुख्य पदापर्यंत पोहचायला एक एक पायरी करून दिली. अजित पवार यांनी पुरोगामी विचार जपला’. शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या, ‘अजित पवारांच्या विरोधात काम करताना राजकीय वाटचाल आमची सुरू झाली. प्रा. रामकृष्ण मोरे यांना विधानपरिषद निवडणुकीत मदत करा म्हणून फोन करणारे अजित पवार होते. विरोधकांना आर्थिक बजेट न दिल्याने दादाकडे तक्रार केली. त्यांनी मार्ग काढला. वैर जिवंतपणीच संपवायला हवे’.
महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सीमा सावळे म्हणाल्या, ‘माझे नेतृत्व अजित पवार यांनी घडविले. संपूर्ण राज्याचे अजितदादा होते. यावेळी बोलवून उमेदवारी दिली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर वाघीण मागे राहिली म्हणून फोन आला. अजित पवारांचे स्मारक उभे करताना कोणाचेही आभार मानू नये. शहरातील प्रत्येक नेत्यावर अजितदादांचे उपकार आहेत’. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे म्हणाले, ‘विकास आणि विचार यांचे राजकारण करणारा सुवर्ण मध्य अजित पवार होते. धार्मिक ध्रुवीकरणाविरोधात ते होते. ऊर्जा विभागात पायाभूत सुविधा देत लोड शेडिंग थांबवले. आज महाराष्ट्र हळहळला’.
नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘धाडस हा शब्द अजित पवारांना योग्य होता. तो आता राहिला नाही. नवीन महापालिकेसमोर अजित पवारांचा पुतळा उभारावा. प्रत्येक नाट्यगृहात तैलचित्र हवे. नवीन महापालिकेत अजित दादा भवन उभे करावे’. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले, ‘अजित पवारांचे जाणे मन सुन्न करणारे आहे. प्रभागात उद्यान विकसित करण्यासाठी निधी द्या म्हणून आम्ही पाठपुरावा केला. अजितदादांनी आराखडा समजावून घेतला आणि लगेच मान्यता दिली. दादा नॉट रिचेबल अनेकदा व्हायचे. पण आताही तसेच होऊन परत येतील अस वाटायचे. पण आले नाहीत’.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ‘ज्या कार्यक्रमात सोबत असायची त्या व्यासपीठावर श्रद्धांजली अर्पण करणे वेदनादायी आहे. प्रत्येकाला त्यांनी मोठे केले. २००७ मध्ये अतिशय तरुण असताना मला स्थायी समिती अध्यक्ष केले. पक्षभेद विसरून आम्ही काम केले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून अजितदादांच्या नावाने जे करणे शक्य आहे ते करावे’. आमदार अमित गोरखे म्हणाले, ‘आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर सगळे तपासून सही कर असा बोलवून घेऊन त्यांनी मला सल्ला दिला होता. आमदार झाल्यावर आमदार साहेब असा उल्लेख करून आदर द्यायचे. विकासाचे चालत बोलत विद्यापीठ अजित पवार होते. उद्याच्या पिढीला त्यांचे काम कळणे गरजेचे आहे’.
आमदार उमा खापरे म्हणाल्या, ‘सर्व विकासकामे केवळ उद्घाटन न करता तपासून पाहणारा नेता अजित पवार होते. गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार महान व्यक्तिमत्व गेले हे दुःखदायक आहे’. आमदार शंकर जगताप म्हणाले, ‘अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याची मोठी हानी झाली आहे. अजित पवार यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी जे करणे शक्य आहे ते केले जाईल’. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, ‘राजकारणात कोरी पाठी असणाऱ्यांना आमदार, नामदार महापौर अशी पदे देणारे, सर्वांना घडविणारे अजितदादा असे निघून जातील हे पटत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची उंची वाढवणारे ते होते. सुरुवातीपासून दादासोबत राहिलो. आज दादा तुम्ही आम्हाला पोरक करून सोडून गेलात’.

