मुद्रांक शुल्क विभागासाठी चांगल्या अधिकाऱ्याची गरज होती- अजित पवार

राज्याच्या तिजोरीत २५ हजार कोटींहून अधिक कररूपी उत्पन्न देणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागासाठी चांगला अधिकारी हवा आहे, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.

राज्याच्या तिजोरीत २५ हजार कोटींहून अधिक कररूपी उत्पन्न देणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागासाठी चांगला अधिकारी हवा आहे, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. त्यानुसार, डॉ. श्रीकर परदेशी यांना पिंपरीपेक्षा मोठी व राज्याची जबाबदारी देण्यात आली, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी काळेवाडीत केला. अनधिकृत बांधकामप्रकरणी शहरातील तीनही आमदार व सरकार पाठपुरावा करत असून न्यायालयाचा आदर राखून योग्य तो व्यवहार्य तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पिंपरी पालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनांसाठी अजितदादा शहरात होते. परदेशींच्या बदलीवरून उठलेल्या वादळात अजितदादांवर टीकेची झोड उठली होती. या संदर्भात, प्रथमच त्यांनी जाहीरपणे भाष्य केले. ते म्हणाले, मुद्रांक शुल्क विभागासाठी चांगला अधिकारी हवा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या विभागात पारदर्शकता हवी, गळती नसावी. उत्पन्नाचे सर्व पैसे शासनाच्या तिजोरीत यावे. असा विचार शासनातील सर्वानीच केला. त्यानुसार, परदेशींना तेथे पाठवण्यात आले. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे. मात्र, बदलीच्या विषयावर काहींनी उगीचच राजकारण केले, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तशा बातम्या छापून आणल्या. वास्तविक परदेशींना मीच पिंपरीत आणले होते. आता त्यांना राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची गरज आहे. नवे आयुक्त देखील चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी जे पदाधिकारी व अधिकारी प्रयत्नशील असतील, त्यांच्या पाठिशी राहिलो आहे व यापुढेही राहू, असे ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajit pawar shrikar pardeshi tax transfer