राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढते करोनाचे रूग्ण आणि राज्यातील टाळेबंदीबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करताना झालेल्या चुकीबद्दल स्पष्टकरण दिलंय. अजित पवार यांनी टाळेबंदीवर मुख्यमंत्री आदित्य ठाकरे निर्णय घेतील असं वक्तव्य केलं होतं. ही बाब पत्रकारांनी लक्षात आणून देताच अजित पवार यांनी मी माझा तो शब्द मागे घेत म्हणत दुरुस्ती केली. ते पुण्यात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “मी जर मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असं बोललो असेल तर मी त्यातील आदित्य हा शब्द मागे घेतो आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे असं सांगतो. आम्ही सभागृहात एखादा शब्द चुकला की जसं आम्ही तो शब्द मागे घेतो म्हणतो तसं मी म्हणत आहे.”

“राज्याचे मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हेच आहेत”

“मी तसं बोललो आहे की नाही माहिती नाही, पण गर्दी होती मला जास्त थांबायचं नव्हतं. पत्रकार जमलेले असताना त्यांच्याशी न बोलता जाणं उचित दिसलं नसतं म्हणून मी बोललो. मात्र, तिथं ५० पेक्षा अधिक लोक होती. राज्याचे मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हेच आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

“राज्य सरकार उठसुठ सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसू शकत नाही”

अजित पवार म्हणाले, “पीएमपीएल कंपनी वेगळी आहे. त्यात ६० टक्के पुणे महानगरपालिकेचा हिस्सा, तर ४० टक्के पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हिस्सा आहे. दोन्ही पालिकांचे आयुक्त, महापौर आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असे सगळे त्याचे सदस्य आहेत. त्या मंडळातील बरेच सदस्य लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्यात एक नगरसेवक देखील निवडून जातो. त्यामुळे दोन्ही पालिकांनी निर्णय घेतला असेल तर ते लोकांनी निवडून दिलेले आहेत. त्यांनाच असा निर्णय का घेतला हा प्रश्न विचारला पाहिजे.”

“राज्य सरकार उठसुठ सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसू शकत नाही”

पालकमंत्री म्हणून तुम्ही भूमिका घेणार का असा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी संतापून राज्य सरकार उठसुठ सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसू शकत नाही, असं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “जसं केंद्र सरकार केंद्राचे निर्णय घेतं, राज्य सरकार राज्याचे निर्णय घेतं तसंच पीएमपीएल कंपनीबाबत निर्णय दोन्ही पालिकेच्या निवडून गेलेले सदस्यांनी निर्णय घ्यायचा असतो. मला त्याबाबत काहीच माहिती नाही. पुणेकरांनी ज्या लोकांना निवडून दिलंय त्याच लोकांनी पीएमपीएलबाबतचा निर्णय घेतलाय. मी फारतर आयुक्तांना याबाबतची माहिती विचारील,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : राष्ट्रवादीला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले, “मला खासदार…”

“…की ढगातच गोळ्या मारायच्या?”

तुमचा पीएमपीएलच्या ठेकेदारांना कोट्यावधी रुपये देण्याच्या निर्णयाला पाठिंबा आहे का? असं विचारलं असता अजित पवार संतापले. ते म्हणाले, “मी निर्णयाला पाठिंबा आहे असं मी म्हटलं का? की ढगातच गोळ्या मारायच्या? मी असं म्हणतो आहे की लोकांनी निवडून दिलेलं संचालक मंडळ तिथं आहे. त्यांनी विचारपूर्वक जनतेच्या पै पै पैशाची बचत करून निर्णय घेतला पाहिजे, असं माझं मत आहे. पण नक्की काय निर्णय झाला मला माहिती नाही.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar take back his words about cm uddhav thackeray in pune svk 88 pbs
First published on: 15-01-2022 at 20:20 IST