मुंबईतील एल्फिन्स्टन-परळ रेल्वे स्थानकावरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. एक लाख कोटी रुपये खर्च करून बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा सध्याची रेल्वेची परिस्थिती सुधारा, अशा शब्दांत पवार यांनी सरकारला सुनावले. रेल्वेसेवेची परिस्थिती भीषण असल्यामुळेच असे अपघात होत आहेत. बुलेट ट्रेनची स्वप्ने पाहणाऱ्या सरकारने आपल्याकडे आहे ते जपायला हवे, असेही ते म्हणाले. रेल्वे समस्या सोडवण्यासाठी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आग्रही होते. पण मोदी सरकारच्या बुलेट ट्रेनच्या हट्टामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, असा आरोपही त्यांनी केला.

एल्फिन्स्टन-परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरीत आतापर्यंत २२ प्रवाशांना जीव गमवावा लागला. ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पावसामुळे अनेक प्रवासी पुलावर थांबले होते. त्यात इतर फलाटांवरही एकाच वेळी लोकल आल्याने गर्दी वाढली. त्यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक गुदमरले. काही जण बेशुद्ध पडले. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली, असा प्रवाशांचा आरोप आहे.