एकाच प्रभागात अनेकजण इच्छुक असले तरी ज्याला पक्षाची उमेदवारी मिळेल त्याचे काम इमाने इतबारे करा, असा सल्ला देत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या २४० जणांच्या मुलाखती शनिवारी घेण्यात आल्या. चार विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांना शनिवारी बोलावण्यात आले होते. पवार यांच्या बरोबरच खासदार सुप्रिया सुळे, महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे ,आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्तात्रय धनकवडे, श्रीकांत पाटील, सभागृहनेता शंकर केमसे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, अशोक राठी, रुपाली चाकणकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

एका प्रभागातील सर्व इच्छुकांना एकत्र बोलावून त्यांची माहिती घेण्यात येत होती. त्यांना विविध प्रश्नही विचारण्यात येत होते. त्यात पक्षात किती वर्षांपासून काम करता अशीही विचारणा केली जात होती. त्या बरोबरच आरक्षित जागेवरील इच्छुकांना तुमच्याकडे जातप्रमाणपत्र आहे का असेही विचारले जात होते.

प्रत्येक इच्छुकाकडून जी माहिती दिली जात होती, प्रश्नांना जी उत्तरे दिली जात होती ती पवार अत्यंत शांतपणे ऐकून घेत होते.

एका प्रभागातील सर्व इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर पक्ष योग्य व्यक्तीला उमेदवारी देईल. मात्र ज्याला पक्षाची उमेदवारी मिळेल त्यांचे काम इमाने इतबारे करा ,असा सल्लाही ते देत होते.

इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

खडकवासला, शिवाजीनगर, कोथरुड आणि वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी झाल्या. सर्वच इच्छुकांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रविवारी (१८ डिसेंबर) सकाळी साडेआठपासून बिबवेवाडीतील रासकर पॅलेस येथे मुलाखती होणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar took interviews of aspirants for upcoming municipal elections
First published on: 18-12-2016 at 01:12 IST