पक्षविरोधात काम केल्यास हाकलून देईन; अजित पवार यांची कार्यकर्त्यांना तंबी

मावळ राष्ट्रवादीतील तीव्र गटबाजीला वैतागलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील नेत्यांची शनिवारी चांगलीच हजेरी घेतली. दोन डगरीवर हात ठेवणाऱ्यांना पक्षात बिलकूल थारा मिळणार नाही. निवडणुकीच्या प्रचारात ‘दिवसा एक, रात्री एक’ असा प्रकार खपवून घेणार नाही. अधिकृत उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्यास पक्षातून हाकलून देईन, अशी तंबीच त्यांनी दिली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा प्रारंभ पवारांच्या हस्ते कामशेतला झाला, तेव्हा ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, माजी मंत्री मदन बाफना, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे आदी उपस्थित होते. मावळातील गटबाजीचा वाद २५ वर्षांपासून आहे, त्याला मी देखील कंटाळलो आहे, असे सांगून पवार म्हणाले, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करा. बंडखोरीला थारा देऊ नका. एकाने जरी पक्षविरोधात काम केल्यास ‘९८५००५१२२२’ या क्रमांकावर मला लघुसंदेश करा. संबंधितास पक्षातून हाकलून दिले जाईल. असले पुढारी पक्षात नको. मात्र, उगीचच खोडसाळपणा करून चुकीच्या तक्रारी करू नका. ‘घडय़ाळ’ चालवा, नको ते धंदे करू नका. पक्षाचे उमेदवार निवडून न आल्यास एकही पद देणार नाही. यापूर्वी चुकलेल्या गोष्टी आता तरी सुधारा. आतापर्यंत दुर्लक्ष केले, त्याचा फटका बसला. तळेगावात काय घडले, काय कळले नाही. ‘बापू कुठे, गणेश कुठे’ काही मेळ नाही, असे ते म्हणाले. िपपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेली मंडळी तिकडे जाऊन नेते म्हणून मिरवत आहेत. ते केवळ सत्तेला हपापलेले आहेत. सत्तेसाठी कुठेही जातील. त्यांच्या दृष्टीने निष्ठेला महत्त्व नाही, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

उद्धव ठाकरेंना २५ वर्षांत समजले नाही का?

मुंबईत शिवसेनेचा भ्रष्ट कारभार आहे. जागावाटपावरून युती तोडलेल्या भाजप-शिवसेनेने कायम दुटप्पणीपणाचे राजकारण केले. युतीमुळे २५ वर्षे शिवसेना सडत होती, असे उद्धव ठाकरे सांगतात. मग, इतकी वर्षे त्यांना सडण्याची प्रक्रिया समजली नाही का? शिवसेनेचे मंत्री बॅगा भरून निघाले म्हणतात, कशाने बॅगा भरल्यात, ते सांगत नाहीत. रावसाहेब दानवे यांना बोलण्याचे तारतम्य नाही. भाजप सरकारची बनवाबनवी सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार सरकार करत नाही. भाजप हा गुंडांचा पक्ष बनला असून त्यांच्यासमोर पायघडय़ा घालण्याचे काम भाजपने चालवले आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.