पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर यंदा वाहन खरेदी बाजारात मंदीचे चित्र होते. गतवर्षीच्या तुलनेत वाहन नोंदणीत घट झाली असून, पर्यावरणपूरक ईलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांकडे (ईव्ही) ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. यंदा दुचाकी ईव्ही आणि चारचाकी ईव्हींच्या विक्रीत ७० टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन विभागात १२ ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत ७ हजार ५७९ वाहनांची नोंद झाली. गेल्यावर्षी २३ ते ३० एप्रिल दरम्यान ८ हजार २९८ वाहनांची नोंद झाली होती. विद्युत वाहनांच्या नोंदणीत मोठी घसरण झाली असून, गेल्यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या काळात ८९३ ईव्हींची नोंदणी झाली होती. यंदा केवळ ३०६ ईव्हींची नोंद झाली आहे.
ईव्ही दुचाकींची नोंदणी गेल्या वर्षीच्या तुलनेत ६७८ वरून कमी होऊन २२८ झाली आहे. चारचारी ईव्हींची नोंदही २०३ वरून ७८ झाली आहे. गेल्या वर्षी ३ इलेक्ट्रिक टुरिस्ट टॅक्सी , ५ रिक्षा आणि ३ मालवाहू वाहनांची नोंद झाली होती. या श्रेणीत यंदा एकाही वाहनाची नोंद झाली नाही.
यावर्षी केवळ दुचाकीच्या विक्रीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ४ हजार ९९२ दुचाकींची विक्री झाली. गेल्या वर्षी ४ हजार ७१९ दुचाकी वाहनांची नोंद करण्यात आली होती. चारचाकी वाहनांच्या खरेदीत घट झाली असून, यंदा १ हजार ९७३ चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी २ हजार ५९३ चारचाकी वाहनांची नोंद झाली होती. रिक्षांच्या नोंदणीतही घट झाली असून यंदा ७१ रिक्षांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी ३०७ रिक्षांची विक्री झाली होती. गेल्या वर्षीपेक्षा एका बसची विक्री अधिक झाली असून, बसची नोंदणी ३२ वरून ३३ झाली आहे. मालवाहू वाहनांची नोंदणी ३५६ वरून ३२६ झाली आहे. याशिवाय इतर वाहनांची संख्याही ८७ वरून ४३ नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या एका वर्षात ईलेक्ट्रीक वाहनांची नोंद तिपटीहून अधिक झाल्याची माहिती पुणे प्रादेशिक परिवहन मंडळाकडून देण्यात आली. पुणे प्रादेशिक परिवहन मंडळात २०२४-२५ या आर्थिक वर्षात १२ हजार ७३७ विद्युत वाहनांची नोंद होती. त्यात तिपटीने वाढ होऊन १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ३७ हजार ८०८ विद्युत वाहनांची नोंद झाली आहे. आता अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने झालेल्या वाहन नोंदणीवरून बाजारातील ईव्हींची मागणी कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
| वाहन | २०२५-२६ | २०२४-२५ |
| दुचाकी | ४,९९२ | ४,७१९ |
| चारचाकी | १,९७३ | २,५९३ |
| दुचाकी ईव्ही | ६७८ | २२८ |
| चारचाकी ईव्ही | २०३ | ७८ |
| एकूण वाहने | ७,५७९ | ८,२९८ |
