पिंपरी : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा मुक्कामी राहत असलेल्या आकुर्डीत वारकरी भवन उभारावे, अशी मागणी गेल्या दोन दशकांपासून केली जात आहे. महापालिका सर्वसाधारण सभेने वारकरी भवन उभारणीसाठी सन २००६ मध्ये ठरावही केला हाेता. मात्र, अद्याप वारकरी भवनाला मुहूर्त लागलेला नाही. दरम्यान, संत तुकाराम महाराजांची पालखी आज (बुधवारी) आकुर्डीत मुक्कामी असणार आहे.
श्री संत तुकाराम महाराजांचे देहू आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधिस्थळ आळंदी ही तीर्थक्षेत्रे आकुर्डीपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा देहूनंतरचा पहिला मुक्काम आकुर्डीत असतो. येथील पालखी तळाची जागा अपुरी पडत असल्याने वारकऱ्यांची मोठी गैरसोय होते. वारकऱ्यांना हक्काचे निवारा केंद्र मिळावे म्हणून वारकरी संप्रदायाकडून सातत्याने वारकरी भवन उभारण्याची मागणी होत आहे. मात्र, वारकऱ्यांच्या मागणीला अद्याप यश आलेले नाही. दर वर्षी आषाढी वारीच्या वेळी वारकऱ्यांच्या मुक्कामाचा प्रश्न ऐरणीवर येतो.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने आकुर्डीत वारकरी भवन उभारण्याबाबत डिसेंबर २००६ मध्ये ठराव मंजूर केला हाेता. त्यासाठीची जागा निश्चित करून ६६ लाख ९८ हजार रुपयांचा निधीही मंजूर केला. मात्र, २० वर्षांत काहीच झाले नाही. सन २००४ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त शेखरसिंह यांनी संबंधित जागेची पाहणी करून वारकरी भवन उभारले जाईल, असे आश्वासन दिले हाेते. त्यानंतर त्यांनी २०२४-२५ च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात वारकरी भवन उभारण्याच्या कामाचा समावेश केला हाेता. मात्र, पुढे काहीच झाले नाही.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा देहूनंतरचा पहिला मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात असतो. वाढत्या नागरीकरणामुळे पालखी सोहळ्यातील दिंड्या, वारकरी, फडकरी यांना निवासाची समस्या भेडसावत आहे. वारकरी भवन उभारल्यास वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था होईल. त्यामुळे महापालिकेने प्रशस्त व सुंदर वारकरी भवन लवकरात लवकर उभारून वारकऱ्यांना आगळीवेगळी भेट द्यावी, अशी अपेक्षा श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज माेरे यांनी केली.
वारकरी भवन उभारावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आकुर्डी, खंडाेबा माळ येथील २२ गुंठे जागेत भवन उभारण्याचे नियाेजन आहे. यासाठी वास्तुविशारद नियुक्त करण्यात आला असल्याचे स्थानिक नगरसेवक प्रमाेद कुटे यांनी सांगितले.
