पुणे : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या भाविकांची आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, तसेच (एनडीआरएफ) आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून सुरक्षित सुटका करण्यात आली.

बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून २२०, इंद्रायणी नगरी येथून १००, ठाकूरबुवा मंडप येथून ६० आणि गोपाळपुरा येथून २८ अशा एकूण ४०८ भाविकांची सुरक्षित सुटका केली. तसेच विविध ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
याशिवाय, बचाव पथकांनी पूरग्रस्त भागातील १५० गायींचीही सुरक्षित सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रशासनामार्फत बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सातत्याने सुरू असून परिस्थितीवर संबंधित विभागांकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिक व भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच आवश्यक असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मदत व बचावकार्य सुरू

पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) आणि अग्निशमन दलाकडून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच विविध आपत्कालीन घटनांमध्ये तातडीने मदत व बचावकार्य सुरू आहे.

आळंदीतील बचावकार्य यशस्वी

  • नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे आळंदी येथील केंद्रे महाराज मठामध्ये पाणी शिरले होते.
  • या मठामध्ये २० पोलीस कर्मचारी आणि ४ इतर नागरिक, असे एकूण २४ जण अडकले होते.
  • आळंदी नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची माहिती प्राप्त झाली.
  • बचावकार्य: आपत्कालीन व्यवस्थापन पथकाने अत्यंत कौशल्याने लाईफ रिंग, लाईफ जॅकेट आणि रोप (दोरी) यांच्या साहाय्याने सर्व २० पोलीस कर्मचारी आणि इतर ४ नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढले. सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत.

लोणावळा व मळवली परिसर (दरड कोसळणे व बचावकार्य)

  • पाटण-बोरज रोड (लोणावळा): येथे दरड कोसळल्याची घटना घडली असून, आतापर्यंत २ व्यक्तींना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. इतर व्यक्तींचा शोध सुरू आहे.
  • मळवली (मावळ): येथे दरड कोसळून २५ ते ३० जण अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
  • वेदांत कॉलेज (लोणावळा): कॉलेजमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

इतर ठिकाणांवरील मदत व बचावकार्य

  • चाकण एमआयडीसी (कारखान्यात अडकलेले कामगार): चाकण-चिंबळी फाटा येथील एका कंपनीमध्ये पाणी शिरल्यामुळे २० ते २५ कामगार अडकले होते. आपत्कालीन पथकाने लाईफ रिंग, लाईफ जॅकेट व रोप यांच्या साहाय्याने त्यांची सुखरूप सुटका केली.
  • घोरावडी स्टेशन (बस बचावकार्य): घोरावडी स्टेशनजवळ एक बस पाण्यात अडकली असता, बसमधील प्रवाशांना पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले.
  • जांभे गाव (नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर): ग्रामपंचायत हद्दीतील घरांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्यामुळे ३० ते ३५ नागरिकांना सुरक्षितपणे जवळील प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले.
  • धायरी (लक्ष्मी पार्क सोसायटी): बेडरूममध्ये अडकलेल्या ११ वर्षे व ४ वर्षे वयाच्या दोन मुलींची अग्निशमन दलाने सुरक्षित सुटका केली.
  • कासारसाई व मंत्रा २४ वेस्ट सोसायटी: कासारसाई येथील घरांमध्ये तसेच मंत्रा २४ वेस्ट सोसायटीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
  • धानोरे गाव (झाड कोसळणे): रस्त्यावर पडलेले काटेरी बाभळीचे झाड चेन-सॉ व कुऱ्हाडीच्या साहाय्याने कापून क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आले. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा सुरळीत करण्यात आला.
  • नांदेड सिटी (गॅस गळती): मंगल भैरव सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरमधून होणारी गळती थांबवून संबंधित सिलेंडर एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आला.
  • पवना लेक (आपटी गाव): पवना लेक, आपटी गाव येथील रेस्क्यू कॉलनंतर मारुंजी अग्निशमन केंद्राचे वाहन पुढील कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आले आहे.

प्रशासकीय आवाहन

पीएमआरडीए प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके पूर्णपणे सतर्क असून, पूरग्रस्त तसेच दरडप्रवण भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाकडून आपत्कालीन मदत क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत.

  • आपत्कालीन मदत क्रमांक: ९५४५ २८ २९ ३०
  • अग्निशमन दल (नांदेड सिटी केंद्र): ०२०-६७५२०००१ / ०२०-६७५२०००२
  • अग्निशमन दल (मारुंजी केंद्र): ०२०-६७९९२१०० / ०२०-६७९९२१०१
  • अग्निशमन दल (वाघोली केंद्र): ०२०-२९५१८१०१ / ०२०-२९५१९