पिंपरी : इंद्रायणी नदीची पाणीपातळी ओसरल्याने संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास नगर परिषद चौकाजवळील नवीन पुलावरून पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे. रथापुढील १ ते २७ व रथामागील १ ते २० दिंड्यातील प्रत्येकी ५० वारकरी या पुलावरून मार्गस्थ झाले. उर्वरित वारकरी मरकळरोड मार्गे दाभाडे चौकातून चऱ्होली फाटा येथून मार्गस्थ झाले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने बुधवारी सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवले होते. उत्साही वातावरणात पालखीची मंदिराला प्रदक्षिणा झाली होती. पालखी मुक्कामासाठी आजोळी गांधीवाड्यात दाखल झाली होती. येथे सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा वैभवी सोहळा विसावला होता. गुरुवारी सकाळी सहा वाजता आजोळ घरातून माउलींची पालखी खांदेकऱ्यांनी पालिका चौकात आणली. टाळ मृदुंगाच्या गजरात, माऊली माऊलीच्या जयघोषात नगरपरिषद चौकातून नवीन पुलावरून माउलींच्या पालखी सोहळा सव्वा सहाच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाला.
यंदा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याच्या मान आळंदीतील रानवडे घराण्याला मिळाला आहे. पालखीचे सारथ्य हर्षवर्धन रानवडे यांनी केले. पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज लोंढे, रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आळंदीकर ग्रामस्थ व वारकरी भाविक उपस्थित होते. खांद्यावर पताका घेऊन,हाती वीणा , डोईवर तुळशवृंदावन, मृदुंगाच्या टाळाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम जयघोष करीत वारकरी चालत होते.
