आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. अवघ्या काही तासांवर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आलेला असताना देखील प्रशासन इंद्रायणी प्रदूषणाकडे गांभीर्याने बघत नसल्याचं पुन्हा एकदा दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच आळंदीचे विश्वस्त यांनी यासंबंधी आंदोलनाचा इशारा दिला होता. नदीतील फेस आता थेट मंदिराजवळ आला आहे. ज्या ठिकाणी वारकरी मोठ्या श्रद्धेने इंद्रायणीत आचमन करतात तिथेच फेस पोहोचला आहे.

इंद्रायणी नदी जलप्रदूषणाचा प्रश्न खूप वर्षांपासूनचा आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने बघत नाही. याआधी अनेकदा अगदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर आश्वासन दिलं होतं. परंतु, ते आश्वासन हवेत विरल्याचे बोललं जात आहे. त्यानंतरही अनेकदा इंद्रायणी नदी फेसाळलेली. अगदी हिम प्रदेशातील नदीप्रमाणे इंद्रायणी नदी पात्र सर्वांनी पाहिलं आहे. आता पुन्हा एकदा इंद्रायणी नदी प्रदूषित झाली असून केमिकलयुक्त फेस नदीवर दिसत आहे.

हेही वाचा – ‘एआय’च्या साह्याने ‘मेटा’ पकडतेय फेसबुक, इन्स्टाग्रामवरची वयचोरी!

हेही वाचा – जिवाला धोका असूनही महिलेने घेतला गर्भधारणेचा निर्णय…माता, बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश

माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर आला आहे. असं असलं तरी इंद्रायणीमधील प्रदूषण मात्र कमी होत नाही. इंद्रायणी नदी स्वच्छ केली जात नाही. यावरून आक्रमक होत आळंदीचे विश्वस्त यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. अनेकदा जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देखील आळंदी विश्वस्तांनी इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा मांडलेला आहे. पी. एम.आर.डी.ए, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना देखील अनेकदा पत्र दिले आहेत. मात्र तरी देखील हे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आळंदी संस्थांनी केला होता.