दिवाळीच्या सुटीनंतर राज्यातील सर्वच वर्ग सुरू करण्यास मुभा?

ऑनलाइन  शिक्षणातील त्रुटी आणि मर्यादांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी करोना रुग्ण नसलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली.

file photo

ग्रामीण भागामध्ये पहिली ते चौथी, शहरात पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याची मागणी

पुणे : गेल्या काही कालावधीत राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ झालेली नसल्याने दिवाळी सुटीनंतर शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व वर्ग सुरू करण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे. ऑक्टोबरमध्ये ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता ग्रामीण भागातील पहिली ते चौथी, शहरी भागातील पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण विभागही सकारात्मक असल्याने राज्य शासन परवानगी देणार का, असा प्रश्न आहे.

ऑनलाइन  शिक्षणातील त्रुटी आणि मर्यादांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी करोना रुग्ण नसलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यानंतर अन्य वर्ग सुरू करण्याबाबतची मागणी सातत्याने होऊ लागल्याने ४ ऑक्टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावीचे आणि ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या, शहरी भागातील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

हिवरे बाजारसारख्या काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जबाबदारी घेऊन सर्व वर्गांच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून अद्याप घेण्यात आलेला नसल्याने बहुतांश ठिकाणी शक्य असूनही सर्व वर्ग सुरू करता आलेले नाहीत. या लालफितीच्या कारभाराचा फटका शिक्षकांची सर्वाधिक गरज असलेल्या पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे राज्यातील शाळांतील सर्वच वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत आहे.

शहरी आणि ग्रामीण भागातील अन्य वर्ग सुरू करण्याबाबतचा अभिप्राय शिक्षण विभागाने दिला आहे. मात्र करोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन हे वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय शासनाकडून घेतला जाईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी त्या बाबत चर्चा करण्यात येणार आहे.  – विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त

राज्यातील काही ठिकाणच्या शाळातील अनौपचारिक पद्धतीने सर्व वर्ग सुरू आहेत. वास्तविक पहिलीपासूनचे वर्ग या आधीच सुरू व्हायला हवे होते. पण अद्याप काहीच हालचाल दिसत नाही. आता अधिक वेळ न घालवता शासनाने दिवाळीची सुटी संपल्यावर राज्यात सर्वत्रच पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे.  – डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: All classes in the state are allowed to start after the diwali holiday akp

ताज्या बातम्या