पालकमंत्री गिरीश बापट यांचे मत

आपल्या सर्व व्यवहारांमध्ये महिला केंद्रिबदू असतील तर त्याचा पुरुषांना आणि समाजाला चांगला फायदा होत असतो. त्यामुळे शासनाच्या सर्व योजना महिलाकेंद्री असल्या पाहिजेत, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि दृष्टी स्त्री अध्ययन-प्रबोधन केंद्रातर्फे आयोजित ‘राज्याच्या जेंडर बजेटच्या दिशेने : स्थिती आणि उपाय’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, सदस्य सचिव देवयानी ठाकरे, गयाताई कराड, आमदार मेधा कुलकर्णी, केंद्राच्या अध्यक्षा गीता गोखले आणि अंजली देशपांडे या वेळी उपस्थित होत्या.

अर्थसंकल्पावरील चर्चा किचकट असली तरी अर्थसंकल्प समजून घेणे तुलनेने सोपे असते. आर्थिकदृष्टय़ा कसे वागले पाहिजे याचा मार्ग अर्थसंकल्प दाखवितो, असे सांगून बापट म्हणाले, की महिलांच्या नेमक्या समस्या ओळखून त्या समस्यांच्या निराकरणाचे प्रयत्न झाले

पाहिजेत. आपल्या राज्यामध्ये विविध क्षेत्रांत काम करण्यास महिला सक्षम आहेत. आपले हक्क आणि अधिकारांसाठी महिलाच संघटित झाल्या नाहीत, तर त्यांच्यासाठी केलेल्या योजना केवळ कागदावरच राहतील. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य महिला आयोगाने सरकारवर लक्ष ठेवले पाहिजे. महिलांच्या विविध योजनांसाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून काही निधी राखीव ठेवला जाईल.

रहाटकर म्हणाल्या, की महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशातून ७३ व्या आणि ७४ व्या घटना दुरुस्तीने महिलांना आरक्षण मिळाले. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांनी स्त्रीकेंद्री अर्थसंकल्प ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रही त्यादृष्टीने प्रयत्नशील असून त्याच उद्देशातून राज्य महिला आयोगाने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अंजली देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.

महिलांच्या हक्कांसाठी

महामार्गावर महिलांसाठी प्रसाधनगृह उभारावीत, अशी सूचना राज्य महिला आयोगाने राज्य सरकारला केली आहे. मात्र, हे सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचे की परिवहन मंत्रालयाने, या विषयावर खल झाला, याकडे विजया रहाटकर यांनी लक्ष वेधले. मात्र, प्रवासी महिला या राज्याच्या नागरिक नाहीत का, असा प्रश्न मी सरकारपुढे उपस्थित केला आहे, असेही त्यांनी सांगितले. महिलांच्या हक्कांसाठी आणि बरोबरीच्या नात्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.