सातारा शहरातील साहित्यप्रेमींना आता आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत. पुस्तकांच्या दालनातूनच साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपात जाण्याचा मार्ग खुला करून देऊन आयोजक संस्थेने प्रकाशकांना जिंकून घेण्यात बाजी मारली आहे. साहित्य संमेलनाचे कार्यक्रम एका बाजूला आणि ग्रंथप्रदर्शन दुसरीकडे अशी आजवरच्या संमेलनांची स्थिती आणि त्यातून प्रकाशक व संयोजक यांच्यामध्ये येणारी कटुता टाळण्यासाठी हा सुवर्णमध्य साधला गेला आहे. त्यामुळे सातारा ग्रंथ महोत्सव आणि नुकताच पुण्यात झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवानंतर या संमेलनात पुस्तकांना चांगली मागणी असेल, ही प्रकाशकांची अपेक्षा फलद्रूप होण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार या प्रकाशक असल्याने यंदाच्या संमेलनामध्ये हा महत्त्वपूर्ण बदल घडून आला आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये नऊ दिवसांत ५० कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाल्याचा दावा आहे. साडेबारा लाख नागरिकांनी दिलेल्या भेटीतून वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या वैविध्यपूर्ण वाङ्मय प्रकारातील पुस्तकांच्या सुमारे ३० लाख प्रतींची विक्री झाली. ही बाब ध्यानात घेऊन आता सातारा येथील साहित्य संमेलनामध्येही मोठ्या रकमेची उलाढाल होईल, अशी अपेक्षा प्रकाशक बाळगून आहेत. त्या दृष्टीने प्रकाशकांनी साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शन दालनांची जय्यत तयारी केली आहे.

‘पुस्तकांच्या दालनातूनच साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपात जाण्याचा मार्ग खुला करून देत सातारा येथील साहित्य संमेलन हे पुस्तककेंद्रित असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सिद्ध केले आहे,’ असे रोहन प्रकाशनाचे प्रदीप चंपानेरकर यांनी सांगितले. पुणे पुस्तक महोत्सव आणि साहित्य संमेलन अशी दुहेरी तयारी म्हणून प्रकाशनाची विविध साहित्य प्रकारांतील २५ नवी पुस्तके वाचकांच्या हाती सुपूर्द करताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनामध्ये सहभाग हा केवळ व्यवसायाचा भाग म्हणून नाही, तर पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम म्हणून पाहत असल्याचे पद्मगंधा प्रकाशनाचे अभिषेक जाखडे आणि दिलीपराज प्रकाशनाचे मोहित बर्वे यांनी सांगितले. या निमित्ताने पुस्तकांच्या माध्यमातून लेखक आणि वाचक यांच्या भेटीगाठी होतात, हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

साहित्य संमेलनात ११० पुस्तकांचे प्रकाशन

सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यभरातील लेखकांची तब्बल ११० पुस्तके प्रकाशित होत आहेत. पाच सत्रांत होणाऱ्या या प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन नियोजित संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते होईल.

नववर्षारंभी म्हणजे १ जानेवारी रोजी सायंकाळी पहिल्या सत्रात संस्कृती प्रकाशनाने केलेले ‘जनसंवाद राजमातांचा’ हे राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या ऐतिहासिक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भाषणांचा आढावा घेणारे पुस्तक व देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केलेले नरहर कुरुंदकर यांचे ‘युगप्रवर्तक छत्रपती’ ही पुस्तके प्रकाशित होत आहेत. मराठीतील ज्ञानभांडार अंध वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेली पाच पुस्तके ब्रेल लिपीत येत आहेत. या निमित्ताने साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर प्रथमच दृष्टिहीन वाचकांसाठी पुस्तके प्रकाशित होत आहेत.

‘कथा, कविता, कादंबरी, ललित, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य, लोककला, विनोदी लेखन, प्रवासवर्णन, गुंतवणूक अशा सर्व प्रकारांतील पुस्तकांचे प्रकाशन साहित्य संमेलनात होणार आहे,’ अशी माहिती प्रकाशन कट्ट्याचे समितीप्रमुख शिरीष चिटणीस आणि मुख्य समन्वयक घनश्याम पाटील यांनी दिली.

vidyadhar.kulkarni@expressindia.com