पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) तीन वर्षांच्या खंडानंतर आता नव्या अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासह काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक कार्यालये बंद करून आता संपूर्ण मान्यता प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर एक खिडकी पद्धतीने राबवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षासाठी मान्यता प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) माहितीपत्रक प्रसिद्ध केले. घटत्या विद्यार्थिसंख्येमुळे नव्या महाविद्यालयांबाबत एआयसीटीईने गेली तीन वर्षे निर्बंध घातले होते. मात्र आता शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी मान्यतेच्या निकषांमध्ये शिथिलता आणल्याने आता पुन्हा एकदा संस्थांना नवे महाविद्यालय सुरू करण्यासाठीचा अर्ज करता येणार आहे. त्याशिवाय मान्यता प्रक्रिया सुलभ होण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे. महाविदयालये, उच्च शिक्षण संस्थांना या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. याच संकेतस्थळाद्वारे एक खिडकी पद्धतीने मान्यता प्रक्रिया राबवण्यात येईल. मान्यता प्रक्रिया केंद्रीय पातळीवर होणार असल्याने देशभरातील प्रादेशिक कार्यालये बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांतील पायाभूत सुविधा, संस्थेची जागा, प्राध्यापकांची संख्या याबाबत शिथिलता देण्यात आली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व शाखांमध्ये कमाल विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आता तीनशेऐवजी ३६० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांना नव्या विद्याशाखा सुरू करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. नव्या विद्याशाखांचे सुरुवातीला केवळ तीन वर्ग चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी या तीनही अभ्यासक्रमांसाठी हे बदल लागू असतील. निमशहरी आणिग्रामीण भागांमध्ये तंत्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी एआयसीटीईकडून आता आकांक्षा जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यासाठी प्लेसमेंट सेल, कौशल्य विकास अभ्यासक्रम, कार्यप्रशिक्षण संधी हे घटक मान्यता प्रक्रियेत महत्त्वाचे असतील.
परदेशी संस्थाशी सहकार्य
टाइम्स हायर एज्युकेशन आणि क्यूएस क्रमवारीतील जागतिक स्तरावरील पहिल्या पाचशे संस्थांशी एनआयआरएफ क्रमवारीतील पहिल्या शंभर संस्थांना सहकार्याची परवानगी होती. मात्र आता हा नियम शिथिल करून देशातील एनबीए मानांकनाचे ६५० गुण किंवा एनआयआरएफमध्ये पहिल्या १०० संस्थांमध्ये असलेल्या संस्थांना जगभरातील पहिल्या एक हजार संस्थांमध्ये असलेल्या संस्थांशी सहकार्य करता येईल. तसेच नॅकचे ३.१ गुण असलेल्या देशातील विद्यापीठांना दुहेरी, संयुक्त किंवा ट्विनिंग पदवी सुरू करता येईल. संबंधित संस्थांना अधिकचा ६० विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू करण्यास परवानगी असेल.
मायनर डिग्री
विद्यार्थ्यांमधील उद्योजकता वाढीस लागण्यासाठी ‘मायनर डिग्री’ सुरू करण्याचा निर्णय एआयसीटीईने घेतला. त्यात इनोव्हेशन, आंत्रप्रुनरशीप, व्हेंचर डेव्हलपमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट, मार्केटिंग, फायनान्स हे विषय पदवीपूर्व स्तरावर उपलब्ध असतील. तसेच डिझाइन अँड टेक्नॉलॉजी, फाइव्ह जी अँड ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी यांचा अभियांत्रिकीच्या कोणत्याही स्तरावर मायनर डिग्री म्हणून समाविष्ट करता येईल. मायनर डिग्रीसाठी नियमित पदवी अभ्यासक्रमात आवश्यक असलेल्या १६३ श्रेयांकांसह अधिकचे १८ ते २० श्रेयांक आवश्यक असतात. आता एआयसीटीईकडून व्यावसायिक (व्होकेशनल) अभ्यासक्रमांना मुदतवाढीऐवजी ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल.