केंद्रात भाजपचे सरकार येऊन सात वर्षाचा काळ झाला आहे. या दरम्यान सतत इंधन दरवाढ आणि अन्याय अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ झाली आहे.त्या पार्श्वभूमीवर १ मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ३० एप्रिल रोजी महाविकास आघाडीसह पुरोगामी संघटनांची, पुण्यातील अलका टॉकीज चौकात महाराष्ट्र सद्भावना सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेबाबत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, अजित अभ्यंकर,नितीन जगताप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

देशातील जनतेची फसवणूक करून केंद्रातील सरकार सत्तेत आले आहे. केंद्र सरकारने सत्तेत आल्यापासून सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. सतत इंधन दरवाढीमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. या विरोधात जो कोणी आवाज उठवेल, त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याचे काम आजपर्यंत केंद्र सरकारकडून सुरू आहे. आता तर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यातून राज्याचे नाव बदनाम करण्याचे काम काही जण करीत आहे. अशा व्यक्तींचा आणि पक्षांचा आम्ही निषेध व्यक्त करतो अशी टीका या पत्रकार परीषदेच्या माध्यमातून करण्यात आली. यासाठी १ मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ३० एप्रिल रोजी महाविकास आघाडीसह पुरोगामी संघटनांची, पुण्यातील अलका टॉकीज चौकात महाराष्ट्र सद्भावना सभा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध पक्षांचे आणि संघटनांचे नेते सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.