पुणे : सिंहगड रस्ता भागात शनिवारी रात्री एका अल्पवयीन मुलाने त्याच्यावर गोळीबार झाल्याची माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा घटनास्थळी पुंगळी सापडली नाही. मुलाने दिलेल्या माहितीवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल परिसरात युवासेनेचे शहर प्रमुख निलेश गिरमे यांचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या परिसरात दोन मुले थांबली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी मुलावर गोळीबार केला. पिस्तुलातून गोळीबार झाल्यानंतर मुलगा वाकल्याने तो बचावला, अशी माहिती मुलाने पोलिसांना दिली.

हेही वाचा…धक्कादायक! पुण्यात भावाने केला बहिणीचा गळा दाबून खून, हडपसर पोलिसांनी आरोपीला केली अटक

मुलाने गोळीबार झाल्याची माहिती दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, तसेच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाची चौकशी केली. घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा घटनास्थळी पुंगळी सापडली नाही. पुंगळी न सापडल्याने पोलिसांनी मुलाने दिलेल्या माहितीवर साशंकता व्यक्त केली आहे. याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.