फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये शिकणारे काही विद्यार्थी हे नक्षलवादी चळवळीशी संबंधित असून, २१ ऑगस्ट रोजी करण्यात आलेला कबीर कला मंचचा कार्यक्रम हा राजकीय हेतूने आयोजित करण्यात आला होता, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप), पुणे महानगर शाखेच्या वतीने करण्यात आला आहे.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी डॉ. दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘जय भीम कॉम्रेड’ हा चित्रपट आणि कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाचे बुधवारी (२१ ऑगस्ट) आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर एफटीआयआयचे विद्यार्थी आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली होती. या पाश्र्वभूमीवर अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी एफटीआयआय स्टुडंट असोसिएशनतर्फे सोमवारी मोर्चाही काढण्यात आला होता.
अभाविपने एफटीआयआयच्या काही विद्यार्थ्यांचा नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा आरोपही केला असून त्यासंबंधीचे पुरावे पोलिसांना दिले असल्याचे प्रसिद्धी पत्राकामध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे फिल्म इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांनी २१ ऑगस्टला आयोजित केलेला कबीर कला मंचचा कार्यक्रमही राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप करून या कार्यक्रमानंतर ‘मी नक्षलवादी आहे,’ असे ओरडून सांगणाऱ्या विद्यार्थ्यांवर इन्स्टिटय़ूटने आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही अभाविपने केली आहे.