पुणे : देशातील नागरिकांना आजही दैनंदिन आहारातील प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागते. आपल्या रोजच्या आहारामध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणात असली तरी, त्यातून आवश्यक प्रथिनांची गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे रोजच्या आहारात बदामांचा समावेश केल्यास प्रथिनांची गरज भरून निघेल, असा सूर चर्चासत्रात मंगळवारी व्यक्त करण्यात आला.

अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाच्या वतीने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यात अभिनेत्री सोहा अली खान, फिटनेस एक्स्पर्ट यास्मिन कराचीवाला आणि दिल्लीतील मॅक्स हेल्थकेअरच्या विभागीय प्रमुख रितिका समद्दार यांनी सहभाग घेतला. भारतीय नागरिकांच्या पोषणातील प्रथिनांची कमतरता यावर प्रामुख्याने यावेळी चर्चा करण्यात आली. आहारमधील छोटे बदलही मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे रोज आहारात मूठभर बदाम खाण्याने सर्वच वयोगटांतील व्यक्तींसाठी प्रथिनांची पातळी सुधारण्यात मदत होऊ शकते हे अधोरेखित करण्यात आले.

सर्वांगीण वाढीस, आरोग्यास आणि ताकद वाढविण्यासाठी प्रथिने हा अत्यावश्यक घटक आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, तरुणांना ऊर्जा मिळवण्यासाठी आणि प्रौढांना स्नायूंची दुरुस्ती व संपूर्ण आरोग्यासाठी प्रथिनांची गरज असते. भारतीय आहार या बाबतीत कमी पडतो. सक्रिय जीवनशैली असलेल्या किंवा जास्त पोषणाची गरज असलेल्या व्यक्तींना ही समस्या अधिक जाणवते. त्यामुळे जेवणामध्ये किंवा नाश्त्यांमध्ये बदामांचे सेवन करणे परिणामकारक ठरू शकते. बदाम हे नैसर्गिक प्रथिन स्रोत आहेत. ३० ग्रॅम बदामातून सुमारे ६ ग्रॅम प्रथिने मिळतात. त्यासोबतच मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि झिंकसारखी आरोग्यासाठी आवश्यक पोषकतत्त्वेही मिळतात, याकडे चर्चासत्रातील वक्त्यांनी लक्ष वेधले.

माझ्या आहारात प्रथिनांना सर्वांत वरचे स्थान आहे. विशेषतः माझ्या मुलीसाठी बदाम हे पोषणाचा सोपा स्रोत ठरले आहेत. माझ्या मुलीच्या आहारात मी बदाम वापरते. त्यामुळे तिला दररोज पुरेशी प्रथिने मिळतात. चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यानही मला बदाम खायला आवडतात. त्यातून मला सातत्याने ऊर्जा मिळते.

सोहा अली खान, अभिनेत्री