पुणे : ‘महाराष्ट्रातील राजकारण निव्वळ वेडेपणाचे झाले आहे. सत्तेत गेल्यानंतर सगळेच पक्ष निर्घृण, क्रूर आणि नीच होतात. राजकारण्यांमुळे आपण फुकटखोर आणि सवलतबाज झालो आहोत. राजकारण्यांकडून साड्या आणि पैसे घेतल्यामुळे आपण आत्मसन्मान गमावून बसलो आहोत,’ अशी टीका ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अंबरीश मिश्र यांनी गुरुवारी केली. “तुम्ही परीक्षा नीट का घेत नाही, असा प्रश्न आपली मुले विचारत आहेत. त्यांना यश लाभो ही प्रार्थना आहे,‘ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
साधना प्रकाशनातर्फे साधना साप्ताहिकाच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘गांधीच्या सहवासात एक आठवडा – लुई फिशर’ या अंबरीश मिश्र अनुवादित विशेषांकाचे प्रकाशन झाले. त्याप्रसंगी मिश्र बोलत होते. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी-कोकणी लेखक दत्ता दामोदर नायक, ‘साधना ट्रस्ट’चे अध्यक्ष विवेक सावंत, विश्वस्त मुक्ता पुणतांबेकर, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते.
मिश्र म्हणाले, ‘देशात सत्तर वर्षांत केवळ राजकारण झाल्याने पाश्चात्य देशांप्रमाणे न्यूटन, आइन्स्टाइन येथे झाले नाहीत. सवलतबाज झाल्यामुळे आपण प्रजा झालो. मात्र, नागरिक झालो नाहीत. त्यामुळे लोकशाहीचे पात्र मलीन झाले आहे. प्रत्येक गोष्ट सामाजिक आणि राजकीय चष्म्यातून पाहण्याची वाईट सवय लागली आहे. शोषित, वंचित, दलित यांच्या आक्रोशाचा मतांसाठी उपयोग केला जात आहे. समता, न्याय , बंधुता ही बडबड जगात कोणी करत नाही. तिथे आदर्श प्रणालीने लोकांची कामे होतात. आपल्याकडे गटाराचे झाकण लावले नसल्यामुळे माणसाचा मृत्यू होतो.’
‘गांधींनी खिलाफत चळवळ करायला नको होती. खिलाफतीमुळे त्या धर्माचे धर्ममार्तंड तेव्हा पुढे आले आणि या धर्माचे धर्ममार्तंड या पंधरा वर्षांत पुढे आले,’ असे परखड मत मिश्र यांनी व्यक्त केले. हा धागा पकडून नायक यांनी ‘गांधींनी राजकारणात धर्म आणला आणि त्याचा फायदा रा. स्व. संघाला झाला काय, ही शंका येते. भारतीयांनी पोर्तुगीज, डच, ब्रिटिश यांना पचवले. ते मोदी आणि शहा यांनाही पचवतील,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
सावंत म्हणाले, ‘नागरिक शक्ती आणि सरकार यांचा संघर्ष अटळ आहे, असे गांधी म्हणाले होते. मधल्या काळात गांधींबद्दल वाईट प्रचार झाला. मात्र, नागरिक आणि सत्ता यांच्यात संघर्ष उभा राहतो, त्यावेळी लोकांमधील गांधी जागा होतो आणि रस्त्यावर दिसून येतो. त्याची प्रचिती जंतरमंतर येथील आंदोलनावरून आली. या मुलांनी गांधी वाचले नसतील तरी त्यांच्या चळवळीचे तंत्र आणि तत्त्व कालसुसंगत आहे. गांधी भारतीयांच्या गुणसूत्रात आहेत. त्यामुळे संघर्षात गांधी सतत दिसत राहतील.’
