जुन्नर : आंबेगाव, खेड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने पाच ठिकाणी छापे टाकून गुटखा, भेसळयुक्त सुपारी, मैदा, बेसन, वाटाणा असा सुमारे १९ लाख रुपयांचा साठा जप्त केला.

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे एका गोदामावर कारवाई करून गुटखा, पानमसाला जप्त करण्यात आला. मंचर येथे एका दुकानातील भेसळयुक्त मैदा, बेसन आणि आटा असा सुमारे दहा लाख ४९ हजार रुपयांचा माल केला आहे. या मालाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहायक आयुक्त दि. वा. भोगावडे यांनी सांगितले.

खेड तालुक्यातील खालची भांबुरवाडी येथील येथे विनापरवाना चालविण्यात येणाऱ्या सुपारीच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. तेथे आरोग्यास घातक असलेली सुमारे आठ लाख रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली आहे. नरे येथील एका फरसाणच्या दुकानामध्ये हिरव्या वाटण्यात हानिकारक कृत्रिम रंगांचा वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. रंगाचे नमुने घेण्यात आले असल्याचे भोगावडे यांनी स्पष्ट केले.

सहायक आयुक्त भोगावडे, नारायण सरकटे आणि प्रदीप आंबरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत अन्नसुरक्षा अधिकारी स्वाती मरके, सुप्रिया जगताप, संतोष सावंत, सतीश हाके, प्रकाश कचवे, लक्ष्मीकांत साळवे, अभिजित झोडगे, आदित्य जोशी, संकेत सूर्यवंशी आणि नमुना सहायक साळवे सहभागी झाले होते. दरम्यान, ‘भेसळयुक्त अन्नपदार्थांचे उत्पादन करणाऱ्यांंवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी संशयास्पद कारखाने आणि दुकानांची माहिती देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केली आहे.