जुन्नर : आंबेगाव तालुका पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे बहुमत असल्याने सभापतिपदी कैलासबुवा काळे, तर उपसभापतिपदी ज्योती पारधी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

घोडेगाव येथे पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन वाघ यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली. या पंचायत समितीमध्ये दहा सदस्य असून, आठ सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आहेत. काळे आणि पारधी या उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज आला नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, सभापतिपद घोडेगाव परिसराला मिळावे, अशी मागणी घोडेगाव ग्रामस्थांनी केली होती, त्यानुसार काळे यांची या पदावर वर्णी लागली आहे. आदिवासी समाजाला प्रतिनिधित्त्व म्हणून ज्योती पारधी यांना उपसभापतिपदाची संधी देण्यात आली.

दरम्यान, घोडेगाव येथे शरद सहकारी बँकेत आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, ‘राष्ट्रवादी’चे निवडणूक निरीक्षक संजय काळे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये सभापतिपदासाठी कैलासबुबा काळे, तर उपसभापतिपदासाठी ज्योती पारधी यांची निवड करण्याचे ठरले. त्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले.