नारायणगाव : आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी एका वृद्धाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दामोदर जयराम मिडे (वय ६२) असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरांदळे येथील पाईन मळा परिसरात राहणारे मिडे हे घरात एकटेच झोपले असताना चोरटे घरात गेले. त्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केला. चोरट्यांनी घरातील ऐवज चोरला का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.