पुणे : आंबेमोहोर तांदळाचा हंगाम सुरू झाला असून हंगामाच्या सुरुवातीला यंदा आंबेमोहोर तांदळाच्या दरात २५ ते ३० टक्क्यांहून दरवाढ झाली आहे. घाऊक बाजारात आंबेमोहोर तांदळाच्या प्रतिक्विंटलचे दर १२ ते १४ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेले दोन वर्षे हंगामाच्या पहिल्या टप्यात आंबेमोहोर तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली.
’मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात या दाेन राज्यात आंबेमोहोर तांदळाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा लागवड कमी झाली असून, निर्यातदार व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंबेमोहोर तांदळाची खरेदी सुरू केल्याने दरवाढ झाली’ अशी माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक, तांदळाचे निर्यातदार धवल शाह यांनी दिली.
‘सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो. हा तांदूळ महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बारा महिने वापरला जातो. विशेषता पुण्यात आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे. वर्षभर वापरल्या जाणाऱ्या बासमती, आंबेमोहोर, इंद्रायणी, सुरती कोलम या तांदळांपैकी आंबेमोहोर चांगली मागणी असते. आंबेमोहोर तांदळाचा दर हे यावर्षी कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते’, असे त्यांनी सांगितले.
शहरीकरण, जमिनीला आलेल्या भावामुळे लागवडीत घट
‘राज्यात कामशेत आणि भोर या भागात आंबेमोहोर तांदळाची लागवड काही प्रमाणात केली जाते. काही वर्षांपूर्वी आंबेमोहोर सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते मात्र, हा तांदूळ पिकवणाऱ्या पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर, कामशेत या भागात झपाट्याने शहरीकरण वाढले. जमिनीला चांगला भाव आला म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनीीच विक्री केली. आंबमोहोर हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक आहे. पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड करणे कमी केले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातून विशेषत: पुणे जिल्ह्यातून आंबेमोहर लागवडीचे प्रमाण कमी होत चालले आहे.
आंबेमोहोर महागल्याने इंद्रायणाीला मागणी
‘आंबेमोहोर तांदळाचे भाव वाढल्याने मावळातील इंद्रायणीला तांदाळाला मागणी वाढली आहे. यावर्षी देशात तांदळाचे उत्पादन १२५० लाख टन एवढे झाले आहे. आंबेमोहाेर वगळता बासमती इंद्रायणी, सुरती कोलमचे दर वर्षभर स्थिर राहतील’, असे मार्केट यार्डातील तांदळाचे व्यापरी धवल शहा यांनी सांगितले.
