जम्मू-काश्मीरच्या वैद्यकीय सेवांसाठी ‘बीव्हीजी इंडिया’तर्फे ३४ रुग्णवाहिका

आपत्कालीन प्रतिसाद सेवा देणाऱ्या ‘बीव्हीजी इंडिया लि.’ या कंपनीने जम्मू आणि काश्मीरच्या ‘जेकेईएमएस १०८/१०२’ या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या ताफ्यात आणखी ३४ प्रगत जीवरक्षक रुग्णवाहिका प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दाखल केल्या.

पुणे : आपत्कालीन प्रतिसाद सेवा देणाऱ्या ‘बीव्हीजी इंडिया लि.’ या कंपनीने जम्मू आणि काश्मीरच्या ‘जेकेईएमएस १०८/१०२’ या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या ताफ्यात आणखी ३४ प्रगत जीवरक्षक रुग्णवाहिका प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दाखल केल्या. या नव्या रुग्णवाहिकांच्या समावेशामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘बीव्हीजी’च्या ताफ्यातील रुग्णवाहिकांची संख्या आता ५११ झाली आहे. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या ३४ रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवला. बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी सिन्हा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘जम्मू अँड काश्मीर इमर्जन्सी मेडिकल सव्‍‌र्हिसेस १०८/१०२’ हा जम्मू-काश्मीर सरकार आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतील उपक्रम आहे. हा उपक्रम ४१६ रुग्णवाहिकांसह सुरू करण्यात आला होता. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत, ‘बीव्हीजी’ने यात आणखी ९५ रुग्णवाहिकांची भर घातली आहे. या उपक्रमाद्वारे १५ जानेवारीपर्यंत सव्वा लाखांहून अधिक रुग्णांना सेवा देण्यात आली आहे, अशी माहिती हणमंतराव गायकवाड यांनी मंगळवारी दिली.

रुग्णवाहिकेमध्ये  उपचारांसाठी प्रत्यक्ष डॉक्टरांची उपस्थिती आणि त्यांच्यासोबत औषधे आणि आपत्कालीन जीवरक्षक उपकरणांची उपलब्धता अशी सोय करून देणारी बीव्हीजी रुग्णवाहिका हा भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. सुमारे ४०० बाळांचा रुग्णवाहिकेत जन्म, १२ हजार करोना रुग्णांवर उपचार आणि ७५० रुग्णांना व्हेंटिलेटर लावणे अशा सेवा आतापर्यंत या रुग्णवाहिकांमधून देण्यात आलेल्या आहेत. जम्मू व काश्मीर राज्य सरकारने ‘बीव्हीजी’च्या या कटिबद्ध व दर्जेदार सेवेची दखल घेत कंपनीला ‘सहुलियत काश्मीर’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

नवीन रुग्णवाहिकांची भर पडल्याने रुग्णवाहिकांची संख्या ५११ झाली आहे. यामध्ये डायल १०८ सेवांतर्गत प्रगत जीवरक्षक सुविधा असलेल्या १४५ आणि मूलभूत जीवरक्षक सुविधा असलेल्या ६६ रुग्णवाहिका आहेत. तसेच डायल-१०२ सेवांतर्गत ३०० रुग्णवाहिका समाविष्ट आहेत.

– हणमंतराव गायकवाड, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, बीव्हीजी इंडिया लि.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ambulances bvg india medical services jammu kashmir ysh

Next Story
राज्य गारठले
फोटो गॅलरी