पुणे : कोरेगाव पार्क येथील शासकीय जमीन खरेदी प्रकरणातील मुद्रांक शुल्क बुडविणाऱ्या अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांच्या पुण्यासह धाराशीव तसेच अन्य ठिकाणच्या मालमत्तांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पाटील यांच्या प्रकरणात अंतिम सुनावणी नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे येत्या तीन मार्चला होणार आहे.
कोरेगाव पार्क येथील महार वतनाची चाळीस एकर जागा अमेडिया कंपनीने खरेदी केली होती. हा व्यवहार वादग्रस्त ठरला होता. त्यानुसार ३०० कोटी रुपयांचा दस्त नोंदणीचा व्यवहार झाला. तसेच, तो करताना मुद्रांक शुल्कही बुडविण्यात आले होते. त्यापोटी कंपनीला २१ कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, अमेडिया कंपनीला २१ कोटींची रक्कम भरण्याबाबत सहजिल्हा निबंधकांनी नोटीस बजावली होती. त्यावर मुदत मागितल्याने कंपनीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत १६ फेब्रुवारीला संपुष्टात येताच कंपनीने नोंदणी महानिरीक्षकांकडे रक्कम भरण्यासाठी आणखी मुदत मागितली. त्या बाबत सुनावणी झाली होती. त्यानुसार नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून १५ दिवसांची म्हणजेच तीन मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्या दिवशी आता अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ‘अमेडिया’च्या मालमत्तेची नोंदणी मुद्रांक विभागाकडून शोध सुरू करण्यात आला आहे. धाराशीव येथील जिल्हा सहनिबंधकांना पत्र पाठवून तेथील जमिनींसह मालमत्तेचा शोध घेण्याची विनंती करण्यात आली आहे. पुण्यातील मालमत्ता शोधली जाणार आहे. त्याशिवाय, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाटील यांची जमीन, सदनिका, शेती, वगैरे मालमत्ता कोठे आहे याचा शोध घेतला जाणार आहे. सहजिल्हा निंबधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी नोंदणी महानिरीक्षक तसेच जमाबंदी आयुक्तांना त्या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे.
