पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू झाले आहे. काँग्रेसने निषेध आंदोलनाचा निर्णय घेतला असून, भाजपनेही त्याच ठिकाणी आंदोलन करून प्रतिआव्हान देण्याचा निर्धार केला आहे. शहा यांच्या यांच्या दौरा मार्गातील रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्यानंतर भर पावसात खड्डे बुजविण्यासाठी अधिकाऱ्यांची शुक्रवारी धावपळ सुरू होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सारसबाग येथील स्मारकाच्या ठिकाणी जाऊन अभिवादन करणार आहेत.

दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यासाठी काँग्रेसच्या पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप आणि पश्चिम विभागाच्या अध्यक्ष दीप्ती चवधरी यांनी काँग्रेस भवन येथे बैठक घेऊन शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज् चौकात सकाळी सव्वादहा वाजता निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला प्रत्युत्तर म्हणून भाजपने त्याच ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने अमित शहा यांच्या दौऱ्यावरून आता भाजप आणि काँग्रेस आमने-सामने उभे राहिले आहे.

जंतरमंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन करताना पोलिसांनी बळाचा वापर केला. हे आंदोलन चिरडून टाकण्याचे काम गृहमंत्री अमित शहा यांनी केले. आंदोलन संपल्यानंतरही सरकारने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास, त्यांची धरपकड करण्यास, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना छळण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून हुकूमशाही वृत्तीचा निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे पूर्व भागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसने आंदोलन करण्याचे जाहीर केल्याने भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काँग्रेसला प्रतिआव्हान दिले आहे. शहरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास भाजप जशास तसे उत्तर देईल, अशी भूमिका घाटे यांनी घेतली आहे.

खड्डे बुजविण्यासाठी लगबग

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहा यांच्या दौरा मार्गातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा आदेश दिल्यानंतर अधिकाऱ्यांची खड्डे बुजविण्यासाठी भर पावसात लगबग सुरू होती.