पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे येत्या शनिवारी (१ ऑगस्ट) शहरात होणाऱ्या एका कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसने आंदोलन केल्यास भारतीय जनता पक्षाकडून प्रतिआंदाेलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी दिल्यास भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाला परवानगी द्यावी, असे निवेदन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना बुधवारी दिले.
भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. ‘काँग्रेसकडून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसने आंदोलन केल्यास भाजपही प्रतिआंदोलन करून जशास तशे उत्तर देईल,’ असे निवेदनात म्हटले आहे.
‘कलम ३७० हटवणे, नक्षलवादाविरोधात कडक कारवाई, देशाची सुरक्षा मजबूत ठेवण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. अमित शहा हे कणखर नेतृत्व आहे. काँग्रेसकडून राजकीय हेतूने वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगरसेवक रवींद्र साळेगावकर, राघवेंद्र मानकर, पुनीत जोशी, दीपक पोटे, विश्वास ननावरे, सुशील मेंगडे, अमर आवळे, मनीषा लडकत, दुष्यंत मोहोळ, पुष्कर तुळजापूरकर या वेळी उपस्थित होते.
