पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असून, दिल्लीत जंतरमंतर येथे विद्यार्थांना मारहाण केल्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सातारा रस्त्यावरील उत्सव चौकात घोषणाबाजी करून निषेध आंदोलन केले. काँग्रेसबरोबरच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर आले आहेत. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. या दौऱ्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू झाले आहे.

काँग्रेसने निषेध आंदोलनाचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी काँग्रेसला सातारा रस्त्यावरील उत्सव चौकात आंदोलनासाठी परवानगी दिली. त्यानुसार काँग्रेसचे पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम विभागाच्या अध्यक्ष दीप्ती चवधरी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. आंदाेलनाच्या ठिकाणी कटेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.

या दौऱ्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू झाले. काँग्रेसने निषेध आंदोलनाचा निर्णय घेतल्यावर भाजपनेही त्याच ठिकाणी आंदोलन करून प्रतिआव्हान देण्याचा निर्धार केला होता. मात्र, भाजपकडून आंदोलन करण्यात आले नाही. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी बळाचा वापर केला. आंदोलन संपल्यानंतरही सरकारने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास, त्यांची धरपकड करण्यास, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना छळण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप काँग्रेसने केला. या प्रकाराचा निषेध म्हणून काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान आंदोलन केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाला भेट

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.