पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने अवघ्या चार दिवसांत व्हीआयपी मार्गांवरील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी धावपळ केली. चार दिवसांमध्ये महापालिकेच्या पथ विभागाने पावसाची कोणतीही पर्वा न करता सुमारे १५ हजार चौरस फूट रस्त्यांची डागडुजी केली. यासाठी ११८ टन हॉट मिक्स डांबर, ९७५ पिशव्या कोल्ड मिक्स पिशव्यांचा वापर करण्यात आला.
भर पावसातही महापालिकेच्या पथ विभागाचे हे काम सुरू असल्याने ‘व्हीआयपीं’साठीची ही तळमळ सामान्य पुणेकरांसाठी केव्हा दिसणार अशी भावना सामान्य नागरिकांमधून यावेळी व्यक्त होत होती. भर पावसात प्रशासनाने १५ हजार चौरस फूट रस्त्यांची डागडुजी केली.
केंद्रीय गृहमंत्री शहा एका कार्यक्रमासाठी आज (शनिवारी) १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या वाहनांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. तेथून जाताना वाहनांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी चार दिवसांपासून महापालिकेच्या पथ विभागाने रस्त्यांवर पडलेले खड्डे दुरुस्त करून रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले.
महापालिका प्रशासनाने २८ ते ३१ जुलै या कालावधीत विमानतळ ते स्वारगेट, अण्णा भाऊ साठे स्मारक ते कटारिया हायस्कूल आणि छावणी परिसरातील महत्त्वाच्या मार्गांवर तातडीने डांबरीकरण, खड्डे बुजविणे आणि देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याचे पथ विभागाचे प्रमुख राजेश बनकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या पथ विभागाने चार दिवसांपासून सुरू असलेल्या या कामांसाठी ११८ मेट्रिक टन हॉट मिक्स डांबर, ९७५ पिशव्या कोल्ड मिक्स वापरण्यात आले असून, सुमारे १५ हजार चौरस फूट क्षेत्राची दुरुस्ती करण्यात आली. लोहगाव विमानतळ, पुणे रेल्वे स्थानक, अण्णाभाऊ साठे स्मारक, सारसबाग परिसर, मुकुंदनगर, डायस प्लॉट तसेच पुलगेट, गोळीबार मैदान, धोबी घाट आणि एम्प्रेस गार्डन रस्ता या मार्गांना प्राधान्य देण्यात आले.
ही तर पुणेकरांच्या निधीची उधळपट्टी’
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शहरात येत असल्याने रस्त्यांची सुरू असलेली दुरुस्ती हा विकास नसून, ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ असल्याचा आरोप महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते रामचंद्र उर्फ चंदू कदम यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री शहा शनिवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यासाठी गेल्या तीन दिवसांपासून महापालिका प्रशासनाने ज्या मार्गाने शहा यांच्या वाहनांचा ताफा जाणार आहे. ते रस्ते दुरुस्त करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. ‘सध्या घाईगडबडीने सुरू असलेल्या या कामांमध्ये कोणतीही गुणवत्ता तपासणी होत नाही.
डांबराचे तापमान तपासले जात नसून, रात्रीच्या अंधारात घाईघाईने कामे पूर्ण केली जात आहेत. त्यामुळे ही कामे निकृष्ट दर्जाची असून, त्यात भ्रष्टाचाराची शक्यता नाकारता येत नाही,’ असे कदम यांनी म्हटले.
‘अन्य मार्गाने जाऊन दाखवावे’ ‘
पुणे शहरातील रस्त्यांची खरी अवस्था पाहायची असेल, तर गृहमंत्री अमित शहा यांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या व्हीआयपी मार्गांऐवजी उपनगरांमध्ये जाऊन प्रवास करावा. त्यामुळे पुणेकरांना खड्डे पडलेल्या आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे रोज किती त्रास सहन करावा लागतो, हे समजेल. शहा यांनी निश्चित केलेल्या मार्गाने प्रवास न करता दुसऱ्या मार्गाने जावे,’ असे आवाहन काँग्रेसने केले आहे.
