पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भेटीची आठवण सांगत त्यांच्या योगदानाचा सन्मान केला. शहा यांच्या हस्ते डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टिळक स्मारक ट्रस्टतर्फे पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर झालेल्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गिताली टिळक, डॉ. प्रणती टिळक या वेळी उपस्थित होते.

डोवाल यांच्या भेटीची आठवण सांगताना शहा म्हणाले, मी गुजरातमध्ये गृहमंत्री असल्यापासून अजित डोवाल यांना ओळखतो. आमच्याकडे एक बॉम्बस्फोटांची मालिका (सिरीयल बॉम्ब ब्लास्ट) झाली होता. माझा डोवाल यांच्याशी परिचय नव्हता. नरेंद्र मोदी त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी मला सांगितले, की केवळ एका बॉम्बस्फोटाचा नव्हे, तर याच्यामागे जे लोक आहेत, देशभरात जितके बाँम्बस्फोट झाले आहेत, त्यांचा तपास गुजरात पोलिसांनी केला पाहिजे. तुम्ही अजित डोवाल यांना बोलवा आणि तुमच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करा. मला आठवते, डोवाल माझ्या घरी दुपारी आले होते आणि त्यांनी ज्या टिप्स दिल्या होत्या, त्याचा परिणाम असा झाला की केवळ अहमदाबाद बॉम्बस्फोटच नाही, तर देशभरातील १३ बाँम्बस्फोट गुजरात पोलिसांनी एकाच वेळी उघडकीस आणले होते. ही खूप मोठी कामगिरी आहे.

२०१४मध्ये पंतप्रधान झाल्यावर मोदी यांनी पहिली नियुक्ती केली, ती मुख्य सचिवांची केली नव्हती, तर अजित डोवाल यांची ‘एनएसए’ (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) म्हणून निवड केली होती, मोदी जी यांच्या कार्यकाळाचा जेव्हाही इतिहास लिहिला जाईल, अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षेचे जेव्हा कोणी विश्लेषण करेल, तेव्हा स्पष्टपणे अजित डोवाल यांच्यासाठी एक सुवर्णपान राखून ठेवावेच लागेल, यात कोणालाही शंका नाही, असे शहा यांनी सांगितले.

देशाच्या परराष्ट्र धोरणात पाठीच्या कण्याचा अभाव दिसून येतो, असे मोदी गुजरातमध्ये असल्यापासून सांगायचे. ते पंतप्रधान झाले, मी आधी पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि नंतर मंत्रिमंडळातील त्यांचा सहकारी म्हणून अतिशय बारकाईने पाहिले आहे, की आज भारताचे परराष्ट्र धोरण हे ‘पाठीचा कणा असलेले परराष्ट्र धोरण’ बनले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आपण आदराने जगात आपले स्थान मजबूत केले आहे आणि मोदी सरकारने जे साध्य केले आहे, त्यात अजित डोवाल यांचे खूप मोठे योगदान आहे, अशा शब्दात शहा यांनी डोवाल यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.