पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी आणि मनसे नेते वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी मध्यस्ती केली आहे. नाराज असलेले मोरे यांच्याबरोबर अमित ठाकरे यांनी शुक्रवारी चर्चा केली. वसंत मोरे यांचे म्हणणे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर घालण्यात येणार असून राज ठाकरे यासंदर्भातील योग्य तो निर्णय घेणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, पक्षाच्या सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही अमित ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, ही भेट अमित ठाकरे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात होती. वसंत मोरे यांच्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांची अमित ठाकरे यांच्याबरोबर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती मनसे पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मोरे आणि शहर पदाधिकारी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. मोरे पक्षाच्या बैठकीत त्यांचे म्हणणे मांडण्याऐवजी प्रसार माध्यमांतून आरोप करत आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर सातत्याने टीका होत असल्याने मनसेची बदनामी होत आहे, असा दावा मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे.

हेही वाचा >>> Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या उपस्थितीत एकदिवसीय शिबिर

राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्यानंतर मोरे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत खुलासा केला जाईल, असे मनसे शहर पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार पुणे दौऱ्यावर अमित ठाकरे आले असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांनी मोरे यांच्याबरोबर चर्चा केली. मोरे यांनीही या भेटीला दुजारा दिला. सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळत असलेली वागणूक अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. आगामी निवडणुकीसंदर्भातील रणनीती, गटबाजीची कारणांबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, अमित ठाकरे यांनी बाजू आणि म्हणणे ऐकून घेतले आहे. माझी बाजू प्रथमच ऐकण्यात आली. ती राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचोविण्यात येणार आहे. राज ठाकरे यासंदर्भातील योग्य तो निर्णय घेतली, असे अमित ठाकरे यांनी सांगितल्याचे वसंत मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा >>> कोरेगाव भीमा स्तंभ अभिवादन दिनाच्या नियोजनावरून बार्टीवर होणारे आरोप तथ्यहीन

सुकाणू समितीबरोबरही चर्चा

वसंत मोरे यांच्या भेटीनंतर सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबरही अमित ठाकरे यांनी चर्चा केली. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागस्कर, हेमंत संभूस, योगेश खैरे, गणेश सातपुते, अजय शिंदे, वनिता वागस्कर, रणजित शिरोळे, बाळा शेडगे, किशोर शिंदे यावेळी उपस्थित होते. या बैठकीत मोरे यांच्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. अमित ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजनासंदर्भात ही बैठक होती, असे प्रवक्ता योगेश खैरे आणि हेमंत संभूस यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit thackeray mediation to remove vasant more displeasure pune print news apk 13 ysh
First published on: 09-12-2022 at 19:51 IST