पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात बेकायदा प्रवेश करून गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या बाबत प्राचार्य डाॅ. राजेंद्र काशीराम पाटील (वय ५२, रा. भुसारी काॅलनी, कोथरूड) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
‘अमित ठाकरे हे २० ते २५ पदाधिकाऱ्यांसह सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात शिरले. त्यांनी डाॅ. राजेंद्र पाटील यांच्या कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयात लावलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर हटविली आणि पाटील आणि सहकाऱ्यांना धमकावले,’ असा आरोप डाॅ. पाटील यांनी फिर्यादीत केला.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आवारात घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे डाॅ. पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात बेकायदा प्रवेश करून घाेषणाबाजी, दमदाटी केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना लवकरच चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे. – चिलूमुला रजनीकांत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार
मनसेच्या आंदोलनानंतर उच्च तंत्र शिक्षणमंत्र्यांची भेट
मनसेच्या आंदोलनानंतर उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालायस भेट दिली. संस्थेच्या आवारातील अर्धवट बांधकामांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी प्राचार्यांची भेट घेतली. त्यानंतर उच्च तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दुपारी संस्थेस भेट दिली. प्राचार्यांकडे चौकशी केली. आवारातील पायाभूत सुविधा आणि बांधकामबाबातची माहिती त्यांनी घेतली. पाटील यांनी संबंधित बांधकाम ठेकेदाराशी संपर्क साधून बांधकाम संथगतीने सुरू असल्याबाबत विचारणा केली. प्राचार्यांच्या कार्यालयातील पंतप्रधान मोदी यांची तसबीर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हटविली. भाजप कार्यकर्त्यांनी संस्थेस भेट देऊन मोदी यांची तसबीर पुन्हा तेथे लावली.
