Pune Porsche Car Accident : पुण्यातील कार अपघातातील आरोपीला तो अल्पवयीन आहे म्हणून अवघ्या १५ तासांत विशेष हॉलिडे न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला होता. मात्र बाल हक्क न्यायालयाने याप्रकरणी कडक पावलं उचलली आहेत. बाल हक्क न्यायालयात आज (२२ मे) याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी आरोपीच्या वकिलांनी तो अल्पवयीन असल्याचा युक्तिवाद केला. तर आरोपीने केलेलं कृत्य भयावह असून त्याच्या चुकीमुळे दोन जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे त्याच्यावर खटला चालवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अल्पवयीन आरोपीची १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली आहे. तसे आरोपी सज्ञान आहे की अज्ञान हे पोलीस तपासानंतर ठरवलं जाईल, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, यावर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “या अपघाताप्रकरणी आम्ही न्यायालयाकडे दोन अर्ज केले होते. हे दोन्ही अर्ज रविवारी (१९ मे) झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने फेटाळून लावले होते. परंतु, आज आम्हाला दोन आघाड्यांवर यश मिळालं आहे. त्याला (१७ वर्षीय आरोपी) देण्यात आलेल्या जामीनात सुधारणा करण्यात आली असून त्याची १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्यावर अडल्ट (प्रौढ) म्हणून खटला चालवला जावा, असा अर्ज आम्ही केला होता. न्यायालयाने हा अर्ज विचाराधीन घेतला आहे. यावर येत्या २४ मे रोजी सुनावणी होईल. आम्ही या प्रकरणी सखोल तपास करून एक मजबूत खटला दाखल करू.”

हे ही वाचा >> Pune Accident : अजित पवार गटाचे आमदार आरोपीच्या अटकेनंतर मध्यरात्री पोलीस ठाण्यात का गेले? ठाकरे गटाचा सवाल

या आरोपीने शनिवारी (१८ मे) पुण्यातील कल्याणी नगर भागात त्याच्या वडिलांच्या मालकीच्या पोर्श कारने एका दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार आणि दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं होतं. अटकेनंतर १५ तासांनी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. सरकारी वकिलांनी या आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, आरोपी अल्पवयीन (साडेसतरा वर्षे) असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. परिणामी न्यायालयाने सरकारी वकिलांची मागणी फेटाळत त्याचा जामीन मंजूर केला होता. तसेच आरोपीला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगितलं होतं. त्याचबरोबर आरोपीला वाहन चालवायला देणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच त्याच्या वडिलांना अटक करण्याचे आदेशही दिले होते. आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी मंगळवारी छत्रपती सभाजीनगरमधून अटक केली असून पुणे सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitesh kumar on pune car accident accused can prosecuted as adult asc
First published on: 23-05-2024 at 00:05 IST