scorecardresearch

नागपुरात शिट्टी वाजवल्यानंतर चर्चांना उधाण, भाजपात प्रवेश करणार का? अमोल कोल्हे म्हणाले…

अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं. शिट्टी वाजवल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता थेट अमोल कोल्हे यांनीच भाष्य केलं.

Amol Kolhe on joining BJP
भाजपात प्रवेश करणार का? यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी नागपूरमध्ये शिट्टी वाजवल्याने त्याचे पडसाद थेट चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत उमटले. अमोल कोल्हे यांनी शिट्टी फुंकत त्यांचे घनिष्ठ मित्र आणि महाविकासआघाडीचे बंडकोर नेते राहुल कलाटे यांचाच अप्रत्यक्षपणे प्रचार केल्याची चर्चा रंगली. इतकंच नाही तर आता अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं. शिट्टी वाजवल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता थेट अमोल कोल्हे यांनीच भाष्य केलं.

अमोल कोल्हे म्हणाले, “मी केलेलं भाषण सार्वजनिक मंचावर आहे. नागपूरमध्ये शिवशाही महोत्सवात संविधान जागर या विषयावर बोलताना कोणत्याही कायद्याचा वापर कसा होतो यांचं मी उदाहरण दिलं होतं. ते भाषण एडिट करून माझ्या ‘क्लिप्स’ तयार करण्यात आल्या. त्यामुळे त्याचा अन्वयार्थ काढणं योग्य नाही.”

“माझं भाषण काळजीपूर्वक बघितलं तर मी एक उदाहरण देण्यासाठी त्या कार्यकर्त्याला बोलावलं. त्या कार्यकर्त्याच्या गळ्यात शिट्टी होती. तो कार्यकर्ता नागपूरमधील कार्यकर्ता होता. त्यामुळे मला वाटतं हा एक योगायोग असू शकतो. त्यामुळे त्याचे असे अर्थ काढू नये. मला राहुल कलाटेंना पाठिंबा द्यायचा असता तर मी प्रचाराला गेलो असतो,” असं मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं.

नागपुरात नेमकं काय झालं होतं?

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नागपूरच्या कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी राहुल कलाटे यांचे प्रचारचिन्ह शिट्टी फुंकून कलाटे यांचा अप्रत्यक्षपणे प्रचार केल्याची चर्चा चिंचवड मतदारसंघात सुरू आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी नेत्यांची फौज चिंचवड मतदारसंघात पाहायला मिळाली. बाईक रॅली, सभा, मेळावे मतदारसंघात घेण्यात आले. अशावेळी बंडखोर राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी कोल्हे धावून आल्याचे बोललं जात आहे.

हेही वाचा : अमोल कोल्हेंनी नागपूरात वाजवलेली “शिट्टी” चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ठरु शकते डोकेदुखी

अमोल कोल्हे यांनी राहुल कलाटे यांचा अप्रत्यक्षपणे प्रचार केला असून त्यांनी त्यांची मैत्री जपली का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले गेले. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आल्याचे पाहायला मिळाले नाही. त्यामुळे चिंचवडमध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 10:43 IST
ताज्या बातम्या