पुणे : ‘रस्ते झाले पाहिजेत, पूल झाले पाहिजेत; पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला फुटायचं आहे का? त्याला फुटणे नाही, तर विकणे असेच म्हणतात. निधीसाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तर मग लोकशाहीला टाळे ठोकूया,’ अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवारी शिवसेनेतील (उद्धव ठाकरे) फूटीवरून केली.

पुणे पत्रकार कट्ट्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. कोल्हे बोलत होते. कट्ट्याचे संयोजक नीरज जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रा. योगेश बोराटे, संदीप नर्डीले या वेळी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, ‘राज्याचे प्रश्न केंद्र पातळीवर मांडण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व आवश्यक असते. आता प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत आहे. देशात द्विपक्षीय राजकारण लादले जात आहे. अशा वेळी प्रत्येक प्रदेशाच्या अस्तित्वासाठी, त्या-त्या प्रदेशाचे हित जोपासण्यासाठी प्रादेशिक पक्ष टिकवण्याची गरज आहे.’

‘महाराष्ट्र धर्म काय आहे, हे पुढच्या पिढीला सांगायचे असेल तर, महाराष्ट्राच्या डीएनएमधील समतेचा विचार काय आहे, तो आधी सांगावा लागेल. संतांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आता ‘तथाकथित हिंदुत्व’ हे बाहेरच्या लोकांनी शिकवण्याची गरज आहे का? महाराष्ट्राचा डीएनए आता पुसून, काहीतरी वेगळं लादण्याचा प्रयत्न होत असेल, तर सांस्कृतिक क्षेत्राने पुढे यायला हवे. महाराष्ट्राचे नेमके म्हणणे काय आहे? महाराष्ट्राचा नेमका संघर्ष काय आहे? हे सांगणे गरजेचे आहे. पण, हे सांगणे आता सोपे राहिले नाही,’ असेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

‘जनतेमध्ये धाडस नाही’

‘महागाईचा फटका प्रत्येकालाच बसत आहे. मात्र, त्यावर व्यक्त होण्याचे धाडस जनतेत आहे का? जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधकांनी मोर्चे काढले पाहिजेत, आंदोलने केली पाहिजेत. पण, विरोधकांच्या मोर्चाला तेव्हाच अर्थ प्राप्त होईल, जेव्हा झळ सोसणारी सर्वसामान्य जनता त्या मोर्चांमागे उभी राहील,’ अशी खंत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

‘राजकारणामुळेच मालिका बंद’

‘मी राजकारणात असल्यामुळेच सावित्रीबाई- ज्योतिराव फुले यांच्यावरील मालिका टेलिव्हीजनवरून बंद करायला सांगण्यात आली. राजकारण आणि कला हे दोन वेगवेगळी क्षेत्र आहेत, हे अनेकजण विसरून जातात. कलेकडे एकाच चष्म्याने बघणाऱ्यांनी, कुठलीही गोष्ट राजकारणातूनच केली जाते, असे वाटणाऱ्यांनी त्यांचा चष्मा बदलायला हवा. त्यांनी जरा स्वच्छ मनाने बघितले, तर त्यांना स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे मालिकासुद्धा स्वच्छ हेतूनेच केलेली दिसेल. सावित्रीबाई- ज्योतिराव फुले ही मालिकासुद्धा एका स्वच्छ हेतूनेच केलेली दिसेल. इतिहासाशी प्रामाणिक राहिलात, तर तो इतिहास तुम्हाला भरभरून देतो आणि इतिहासाशी छेडछेड केली तर, तोच इतिहास तुम्हाला तुमची जागाही दाखवतो,’ असेही खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले.