पुणे : ‘राज्यातील दुष्काळाची परिस्थिती, पक्षांतर्गत वाद आणि पदवीधर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्रजींना विरोधकांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे,’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रविवारी केली. शहरात आयोजित एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, निवडणूक आयोगाची प्रक्रिया, महिला सक्षमीकरण आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर त्यांनी भाष्य केले.

अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘दिवाळी साजरी करताना प्रत्येकाने आपल्या परीने काही हिस्सा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावा. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून किंवा थेट आर्थिक मदत करून त्यांना आधार देता येईल. सरकारकडून पाच हजार रुपयांची मदत दिली जात असली, तरी त्यापलीकडेही शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. शेती अधिक शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून अन्य उपाययोजनाही केल्या जात आहेत.’

‘निवडणूक आयोगाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. मतदारयादीतील नावांमध्ये दुरुस्ती, नवीन नावांचा समावेश किंवा नावे वगळण्याबाबत नागरिकांना संधी उपलब्ध आहे. त्यामुळे विरोधकांनी प्रत्येक प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याऐवजी जागरूक नागरिक म्हणून सहकार्य करावे. राजकारणात विरोधकांनी देशाच्या हितासाठीही काम करण्याचा विचार करायला हवा,’ असे त्या म्हणाल्या.

सत्ताधारी पक्षात सर्व काही सुरळीत सुरू असून मुख्यमंत्र्यांना अस्थिर करण्याचा कोणताही प्रयत्न होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात अद्याप महिला मुख्यमंत्री झालेली नसल्याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘राजकारणात महिला की पुरुष असा विचार न करता गुणवत्तेच्या आधारावर नेतृत्वाची निवड व्हावी. महिलांनी चांगले काम केल्यास त्यांना योग्य स्थान मिळेल.’

‘विधाने चर्चेत कशी राहतील, याची राज ठाकरेंना चांगलीच जाण!’

‘राजकारणात वैचारिक मतभेद असले, तरी व्यक्तिगत पातळीवर शत्रुत्व असण्याची गरज नाही. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांमध्ये झालेली मिष्किल टिप्पणी ही त्याचाच भाग होता,’ असे त्या म्हणाल्या. राज ठाकरे यांच्या विधानांबाबत विचारले असता, ‘त्यांना आपली विधाने चर्चेत आणि ‘हेडलाईन’मध्ये कशी राहतील, हे चांगलेच माहीत आहे,’ अशी टिप्पणी अमृता फडणवीस यांनी केली.