पुणे : पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागणार असल्याच्या चर्चेवर ‘देवेंद्रजींना दिल्लीत पाहायला आवडणार नाही. मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राची सेवा करीत आहेत आणि ती जबाबदारी ते नीट निभावत आहेत,’ अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी मंगळवारी पुण्यात व्यक्त केली.
‘ग्रॅव्हिट्स फाउंडेशन’तर्फे शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांना यंदाचा ‘ऊर्जा जीवनगौरव पुरस्कार’प्रदान करण्यात आला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातच राहतील त्यांना दिल्लीत पाहायला आवडणार नाही असे वक्तव्य केले. देवेंद्रजी महाराष्ट्राची चांगली सेवा करत असून ते महाराष्ट्राची जबाबदारी नीट निभावत आहे असेही सांगितले.
गुंगी गुडिया प्रकरणावर अमृता फडणवीस काय म्हणाल्या ?
काँग्रेसने महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला. यावरून राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकणी याविषयी निषेध नोंदवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, सुनेत्रा पवार या सक्षम स्त्री आहेत. अजित दादांच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या होत्या. कुठे बोलायचे आणि कुठे नाही बोलायचं हे सुनेत्रा ताईंना माहीत आहे. काँग्रेस मुद्दामपणे अशी स्टंटबाजी करत आहे. अशीही टिप्पणी अमृता फडणवीस यांनी यावेळी केली.
दरम्यान कार्यक्रमात या वेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘महिला सक्षमीकरण व बालविकास ही दोन्ही क्षेत्रे समाज आणि शासनाकडून दुर्लक्षित आहेत यामध्ये काम होणे गरजेचे आहे. या वेळी ‘ग्रॅव्हिट्स फाउंडेशन’च्या संस्थापिका उषा काकडे, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.
ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते (विशेष आरोग्यसेवा), कायनेटिक इंजिनीअरिंच्या उपाध्यक्षा व ‘कायनेटिक ग्रीन एनर्जी’च्या संस्थापिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी (उद्योजकता), सत्यशोधक चळवळीचे व्यासंगी अभ्यासक प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे (साहित्यसेवा), सोलापूर येथील जिव्हाळा मतिमंद संस्थेचे प्रमुख ए. बी. राजमाने (शिक्षण व समाजसेवा) क्रिकेटपटू तिलक शर्मा, लोकमंगल फाउंडेशनचे विश्वस्त रोहन देशमुख यांनाही यंदाचा ‘ऊर्जा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच, उरी हल्ल्यातील शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या स्मरणार्थ वीरपत्नी सायली अर्जुन जाधव यांना ‘शौर्य पुरस्कार’ व माळशिरस दुर्घटनेतील सात जणांचे जीव वाचवणाऱ्या तांदूळवाडी येथील इरफान मुजावर यांना मानवतावादी पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, तुळशीचे रोप असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे हे सातवे पर्व आहे. प्रास्ताविकात उषा काकडे यांना या पुरस्कारामाची भावना विषद केली. लीना सालढाणा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
