पुणे : ‘उशिरा जन्माला आल्यामुळे निळूभाऊंचा ‘सखाराम बाईंडर’ मी पाहू शकले नाही. पण, यू-ट्यूबवर या नाटकातील त्यांची भूमिका पाहिली आहे. त्यांच्या आवाजात सहजता, दरारा असला तरी कोणताही आव नसायचा. भूमिकेचा केलेला अभ्यास त्यांच्या अभिनयात कधी दिसला नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. ‘ॲक्टिंग सिखनी हो, तो निळू फुले को देखो’, असे गुरू दुबेजी (पं. सत्यदेव दुूबे) आम्हाला नेहमी सांगायचे. इतका मोठा कलाकार माझा निळूमामा आहे, याचा मला अभिनान वाटतो,’ अशा आठवणींना प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांनी शनिवारी उजाळा दिला.
‘राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (एनएसडी) शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला गेल्यानंतर ‘ही मुलगी निळू फुले, दादा कोंडके आणि बाळ ठाकरे यांच्या महाराष्ट्रातून आली आहे, अशी माझी ओळख झाली’, असे त्यांनी सांगितले.
बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय यांच्यातर्फे अभिनेते प्रसाद ओक यांच्या हस्ते अमृता सुभाष यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. उत्तरार्धात अमृता सुभाष यांची समीरा गुजर-जोशी यांनी मुलाखत घेतली.
‘अभिनय व दिग्दर्शनासह पुरुषोत्तम करंडक जिंकल्यानंतर आपल्याला सगळे येते अशा भ्रमात मी होते. त्यावेळी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (एनएसडी) प्रवेश घेण्यासाठी आईने आग्रह धरला. त्यासाठी मी राजी व्हावे म्हणून आईने मला डाॅ. श्रीराम लागू यांना भेटण्यास सांगितले. ‘तुला जे करायचे ते इथे राहूनही करता येईल,’ असे सांगताना लागू यांनी मला निळूभाऊंचे उदाहरण दिले होते. पण, तिथे गेल्यावर पुस्तकांचे वाचन करण्याबरोबर वेगवेगळ्या राज्यातील नाटके पाहता येतील, असा सल्ला त्यांनी मला दिला.
अमृता सुभाष म्हणाल्या, ‘तुम्ही सुरक्षित नसाल तेव्हाच काही गोष्टी पणाला लागतात. बरोबरीच्यांकडे मोठी घरे, आलिशान गाड्या असतात. निळूभाऊनी पैसा कमावला. पण, त्यांचे सामाजिक भान कधी सुटले नाही. कामातील जिवंतपणा, सच्चेपणा आणि इरेला पेटणे महत्त्वाचे असते. माझी जगण्याची काही तत्त्वे आहेत. त्यानुसार निवडणुकीच्या प्रचार व्यासपीठावर मी कधीच जाणार नाही. समाज माध्यमावर होणाऱ्या टीका-टिप्पणीकडे मी तटस्थपणे पाहते. टीका असो किंवा स्तुती ही व्यक्तिसापेक्ष असते, हे संदेशने मला शिकवले.’
ओक म्हणाले, “अवघाची संसार’ मालिकेचा चा पहिला भाग २० वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता. निळू फुले यांनी आमच्या कामाचे केलेले कौतुक हे ऑस्कर पुरस्कारासमान होते. नंतर एकत्र काम करण्याचा योग आला नाही म्हणूनच कदाचित अमृता वेगाने पुढे गेली.’
सुहास जोशी म्हणाल्या, “असेन मी नसेन मी’ नाटकात मी काम करावे, अशी अमृताने विनंती केली. पण, मीच तिला नीना कुलकर्णीचे नाव सुचविले. या नाटकाचे यश सगळे पाहतच आहेत.’ राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.
