कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी होत आहे.
कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदर मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुकचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध न करण्याची भूमिका भाजपा विरोधकांनी घेतली आहे. पोटनिवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबात भाजपा नेतृत्वापुढे मोठे आव्हान आहे. माजी सभागृहनेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत असतानाच दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांनीही उमेदवारीवर हक्क सांगितला आहे.
हेही वाचा- पुणे: ‘डीपीसी’तून शाळांसाठीच्या खर्चात वाढ करणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
टिळक कुटुंबियांपैकी एकाचा विचार निवडणुकीसाठी व्हावा, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली आहे. या बैठकीत उमेदवाराच्या नावाची चर्चा होणार नसल्याचे दावा भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला असून निवडणुकीची तयारीसंदर्भात ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीच्या निमित्ताने भाजपाने निवडणूक तयारीच्या दृष्टीने आघाडी घेतली असून भाजपा ॲक्शन मोडवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.