राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारपरिषद घेत भाजपा, मोदी सरकार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाविकासआघाडीच्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असून, भाजपा नेत्यांकडून जोरादर टीका टिप्पणी सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज माध्यामांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरादार टीका केली. या पार्श्वभूमीवर देखील शरद पवार यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत वक्तव्यं केलं.

शरद पवार म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण ऐकलं. त्या भाषणात त्यांनी काय भूमिका मांडायची ती मांडली. त्यानंतर त्यावर आज माजी मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावरील त्यांची मतं मांडली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, काही करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, हे जे आघाडीचं सरकार झालं. ते सरकार बनवण्यामध्ये आमच्या काही सहकाऱ्यांचा हात होता, त्यात माझाही किंचित होता. माझाही त्यात सहभा होता. मी ज्यावेळी सगळ्या आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत नेतृत्व कुणी करायचं, यासंबंधी दोन-तीन नावं आमच्याकडे आलेली होती. उद्धव ठाकरे ही बाब मान्य करायला तयार नव्हते. ते माझ्या शेजारी बसले होते. शेवटी विचारलं काय करायचं? कुणाला करायचं? उद्धव ठाकरेंचा हात मी हातात धरला आणि तो हात मी वर केला आणि सांगितलं हेच होतील. त्यांची त्या ठिकाणी हात वर करायची तयारी नव्हती, त्यांची मुख्यमंत्री व्हायची तयारी नव्हती. त्यांना अक्षरशा सक्तीने मी हात वर करायला लावला. आणि नंतर त्यांनी सांगितलं, ही गोष्ट सत्य आहे की त्यांचे वडील आणि मी सहकारी होतो. म्हणजे या लोकांना मी लहानपणापासून पाहिलेलं आहे. बाळासाहेब माझे मित्र होते. बाळासाहेबांचे आणि माझे राजकीय मतभेद असायचे, पण व्यक्तिगत सलोखा हा अत्यंत जवळचा होता. बाळासाहेब एक दिलदार असे गृहस्थ होते. त्यामुळे या गृहस्थाने महाराष्ट्रासाठी काही योगदान दिलं, म्हणजे बाळासाहेबांनी त्यांच्या संघटनेने. आणि ज्यावेळी सरकार बनवण्याचा प्रसंग आला. त्यावेळे तीन पक्षांमध्ये सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्या पक्षाचे होते, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा नेता करण्याचं ठरल्यानंतर आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला ही जबाबदारी घ्यायला आपण भाग पाडावं, असा माझा आग्रह होता. माझा आग्रह असल्याने मी सक्तीने त्यांचा हात वर केला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं आणि त्यांची त्या ठिकाणी निवड झाली.”

तसेच, “ पण माझी फडणवीसांना विनंती ही आहे, की कृपा करून अशा गोष्टीत तुम्ही आक्षेप घेऊ नका. त्यांनाही त्याची काही माहिती असेल, कारण फडणवीस यांनी पाच वर्षे उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्यासोबत काम केलं. त्यामुळे त्यांना परस्परांचा परिचय हा निश्चित आहे. त्यामुळे आज अशाप्रकारचा आरोप हा उद्धव ठाकरे यांच्यावर करणं, मला स्वतःला योग्य वाटत नाही. ही वस्तूस्थिती ही मी आज आपल्या सर्वांसमोर मी मुद्दाम सांगू इच्छितो.” असंही यावेळी शरद पवार यांनी आवर्जुन सांगितलं.

इंधन दर वाढीसह विविध मुद्द्य्यांवरून पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले…

याचबरोबर, “त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते, आता मी देखील अनेक वर्षे मुख्यमंत्री होतो. माझी पद्धत काही घडलं की स्वतः तिथे जाऊन बसायचं अशी होती. भूकंप झाला मी जाऊन १५ दिवस तिथे होतो. काही लोकांची अशी भूमिका असते की संकट आलं, ते संकट घालवण्यासाठी सगळी यंत्रणा ही योग्यरितीने कामाला लावायची असेल, तर निर्णय घेणारा माणूस एका ठिकाणी बसून पाहिजे. म्हणून त्यांच्यावर जी सतत टीका केली जाते, की हे बाहेर पडत नाहीत. त्यात काही अर्थ नाही. कारण, मी बघितलं ते मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन-तीन संकटं महाराष्ट्रात आली. अतिवृष्टी झाली कोकणात कोट्यावधींचं नुकसान झालं. मराठवाड्यात शेतीचं नुकसान दोनदा झालं. या प्रत्येक वेळी राज्य सरकारच्यावतीने काय करण्याची गरज आहे. ते करण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पूर्णपणाने ताकद लावली.” असं म्हणत शरद पवारांनी महाविकासआघाडी सरकारच्या कामाचे कौतुकही केले.