निवृत्त पोलीस निरीक्षक आंधळकर यांना सतीश शेट्टी खून प्रकरणी अटक

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना गजाआड केले.

माथेफिरुने त्या तरुणीवर एक – दोन नव्हे तर तब्बल २१ वेळा चाकूने वार केले.

तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना गजाआड केले.
तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि भ्रष्टाचारविरोधी दक्षता समितीचे जिल्हा संघटक सतीश भोजा शेट्टी यांचा सन १३ जानेवारी २०१० रोजी तळेगावात भरदिवसा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. शेट्टी यांचा खून होण्यापूर्वी त्यांनी लोणावळा येथील भूखंड खरेदीचे प्रकरण माहिती अधिकाराचा वापर करून उघडकीस आणले होते. शेट्टी यांनी वडगाव मावळ आणि लोणावळा परिसरातील अनेक प्रकरणे उघडकीस आणली होती. शेट्टी यांचा खून झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून शेट्टी खूनप्रकरणात अॅड. विजय दाभाडे, सराईत गुंड श्याम दाभाडे, डोंगऱ्या राठोड यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, शेट्टी खून प्रकरणात त्यांच्याविरुद्ध सकृतदर्शनी पुरावे न आढळल्याने भादंवि १६९ अनुसार न्यायालयाने त्यांची मुक्तता केली.
शेट्टी खूनप्रकरणाचा तपास न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयकडे सोपविण्यात आला. शेट्टी खूनप्रकरणाच्या अनुषंगाने सीबीआयने पुन्हा तपास सुरू केला. आजी-माजी पोलीस अधिकारी, आयआरबी कंपनीतील अधिकारी अशा २६ जणांची सत्यशोधन तपासणी (लाय डिटेक्टर) करण्यात आली. दरम्यान, शेट्टी यांच्या मारेक ऱ्याचा शोध न लागल्यामुळे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले. सीबीआयकडून गेल्या चार वर्षांत शेट्टी यांच्या खूनप्रकरणाच्या अनुषंगाने जवळपास नऊशे जणांची चौकशी करण्यात आली, तसेच ५५० जणांचे जबाब नोंदविण्यात आले होते. दरम्यान, शेट्टी खूनप्रकरणात सीबीआयच्या पथकाने ग्रामीण पोलिसांच्या कार्यालयावर छापा टाकून तेथून संगणक आणि कागदपत्रे जप्त केली होती. यापूर्वी सीबीआयने आंधळकर यांची चौकशी केली होती. त्यांची सत्यशोधन चाचणी घेतली होती. मात्र, त्या वेळी फारसे काही निष्पन्न झाले नव्हते.
मात्र, गेल्या काही दिवसांत शेट्टी खून प्रकरणात आंधळकर यांच्याविरुद्ध काही पुरावे मिळाल्याने सीबीआयने त्यांना बुधवारी अटक केली. आंधळकर यांना गुरुवारी (७ एप्रिल) शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलीस अधिकाऱ्यांना कोटय़वधींचा मलिदा?

सतीश शेट्टी खूनप्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी कोटय़वधी रुपये घेतल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सीबीआयने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी सुद्धा केली होती. सन २०१० मध्ये ग्रामीण पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांकडे कोटय़वधी रुपयांची मालमत्ता आढळून आली होती. शेट्टी खून प्रक रणात आंधळकर यांना अटक करण्यात आल्यानंतर ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आंधळकर यांनी काही दिवसांपूर्वी पुणे, सोलापूर जिल्ह्य़ातील वाळू वाहतूकदारांची संघटना स्थापन केली होती. या संघटनेतर्फे पुणे-सोलापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन गेल्या महिन्यात करण्यात आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Andhalkar arrested regarding satish shetty murder

ताज्या बातम्या