एखाद्या ठिकाणी जायचे असेल, तर पत्ता कसा शोधायचा, आपण योग्य रस्त्याने जातो आहोत का हे कसे पाहायचे.. अशा अनेक अडचणी अंध व्यक्तींना भेडसावत असतात. प्रत्येक वेळी पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवूनच पुढे जावे लागते. मात्र, आता अँड्रॉइड प्रणाली आणि रस्त्यातील अडथळ्यांची माहिती देणारी काठी अंध व्यक्तींची मदत करणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही प्रणाली विकसित केली आहे.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान शाखेतील चैत्राली खेर, योगिता दाभाडे, स्नेहल कदम आणि स्वाती ढमढेरे या विद्यार्थिनींनी ही प्रणाली विकसित केली आहे. ‘पिक्साबाईट टेक्नॉलॉजी’ या कंपनीने हा प्रकल्प प्रायोजित केला आहे. अँड्रॉइड फोन, हार्डवेअर आणि सव्‍‌र्हरच्या मदतीने ही प्रणाली काम करणार आहे.
अंध व्यक्तींना पत्ता शोधण्यासाठी ही प्रणाली मदत करणार आहे. आपण नेमके कोणत्या ठिकाणी उभे आहोत, ज्या ठिकाणी जायचे आहे, ते ठिकाण कोणत्या दिशेला आहे, संबंधित ठिकाणी कसे जायचे याची माहिती फोनच्या माध्यमातून अंध व्यक्तीला मिळू शकेल. त्याचप्रमाणे अंध व्यक्ती कुठे आहे, कोणत्या दिशेला जात आहे याची माहिती त्याच्या नातेवाईकांनाही या अ‍ॅपमुळे मिळू शकेल. त्याचबरोबर या विद्यार्थिनींनी अंधांसाठी काठीही विकसित केली आहे. या काठीला इन्फ्रारेड सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वाटेत येणाऱ्या अडथळ्यांची माहिती  ‘स्पिक आऊट’ प्रणालीच्या माध्यमातून ही काठी अंध व्यक्तींना देते. त्याचप्रमाणे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन प्रणालीचा टॅग वापरून अंध व्यक्तीला सध्याचे ठिकाण कळू शकणार आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत एका बटनाच्या आधारे अंध व्यक्ती आपल्या नातेवाईकाला एसएमएसही करू शकणार आहे.
या प्रणालीबाबत चैत्राली खेर हिने सांगितले, ‘‘अंधांना प्रवासात विशेषत: अपरिचित ठिकाणी अडथळे येतात. त्यांच्यासाठी हा रस्ता नवखा असतो. त्यांना आम्ही विकसित केलेली ही प्रणाली उपयोगी ठरणार आहे. अंध विद्यार्थ्यांशी, व्यक्तींशी बोलून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून गरजेनुसार त्यात बदल करण्यात आले आहेत. सध्या या प्रणालीच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. लवकरच काही बदल करून ती बाजारात आणण्याचा प्रयत्न आहे.’’