पुणे : मातृत्वाच्या उंबरठ्यावर असतानाच राज्यातील निम्म्याहून अधिक गर्भवती महिलांना रक्तक्षयाचा सामना करावा लागत आहे. गर्भारपणात हिमोग्लोबिनचे प्रमाण धोकादायक पातळीवर असलेल्या महिलांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत आहे.
सन २०२५ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील ही आकडेवारी आहे. देशपातळीवर १५ ते १९ वर्षे वयोगटातील ६३ टक्के मुलींमध्ये रक्तक्षयाचे निदान झाले आहे, तर १९ ते ४९ वर्षे वयोगटातील ५३ टक्के स्त्रियांना रक्तक्षय आहे. गर्भवती स्त्रियांपैकी निम्म्याहून अधिक स्त्रियांना रक्तक्षयाचे निदान झाले आहे. स्त्रियांच्या आहारात लोहयुक्त पदार्थांची कमतरता असल्याने हिमोग्लोबिनची पातळी खाली येते.
गर्भधारणेच्या वेळी गर्भात असलेल्या बाळासाठीही शरीरात अतिरिक्त रक्त तयार करण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे अशक्तपणा, थकवा जाणवणे, त्वचा निस्तेज होणे, चीडचीड होणे अशी लक्षणे दिसायला लागतात. अशा वेळी योग्य पोषण मिळाले नाही, तर ही लक्षणे तीव्र होतात. अपुरे पोषणमूल्य, आरोग्याकडे दुर्लक्ष या कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्त्रियांना या आजाराचा सामना करावा लागत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.
गर्भारपणातील रक्तक्षयामुळे बाळाचे वजन कमी भरणे, बाळ वेळेआधी जन्माला येणे, विकासात अडथळे, कमी प्रतिकारशक्ती, तसेच रक्तक्षय असे धोके बाळाला संभवतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने जननी सुरक्षा अभियान, शिशु सुरक्षा अभियान, ॲनिमियामुक्त भारत, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यांसारख्या कार्यक्रमांची जंत्री असली, तरी दर वर्षी लाखो महिलांमध्ये प्रसूतिपूर्व रक्तक्षयाचे निदान होत असल्याचे सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य खात्याच्या ॲनिमियामुक्त भारत या मोहिमेंतर्गत सन २०२५-२६ च्या मार्चअखेर महाराष्ट्रात २३ लाख ५० हजार ३०८ मातांना प्रसूतिपूर्व रक्तक्षयाचे निदान झाले आहे. १२ लाख ०३ हजार ३६९ मातांना प्रसूतिपश्चात उपचारात्मक औषधे देण्यात आली. तीव्र रक्तक्षय असलेल्या ७६,०८१ गर्भवती मातांना लोहयुक्त इंजेक्शन देण्यात आली.
ग्रामीण भागात प्रमाण कमी
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रक्तक्षयाचा टक्का कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात कमी तपासणी हेही त्याचे एक कारण आहे. पुणे शहर स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेने नुकतेच स्त्रियांच्या आरोग्याविषयी रक्तक्षय चाचणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये तपासणी केलेल्या ८०० स्त्रियांपैकी तब्बल ६५ टक्के स्त्रियांमध्ये तीव्र रक्तक्षय आढळून आला.89,
रक्तक्षयाचे समूळ उच्चाटन करू शकलेलो नाही, याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे किशोरवयीन मुलींमध्येच रक्तक्षय आढळून येतो. त्यानंतर या मुली गर्भधारणेच्या टप्प्यावर येतात, त्या वेळेस त्यांच्यात रक्तक्षय वाढलेला असतो. त्यामुळे किशोरवयात या विषयी अधिक काळजी घ्यायला हवी.
- डॉ. अमेय पुरंदरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना
जोडपी सहसा गर्भधारणेपूर्वी समुपदेशनासाठी येत नाहीत. गर्भधारणा होण्यापूर्वी तीन महिने फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेणे गरजेचे आहे, जेणेकरून बाळ निरोगी जन्माला येईल. मात्र, शहरी भागातही उच्चशिक्षित जोडप्यांमध्ये या विषयीची फारशी माहिती नाही. बऱ्याचदा गर्भधारणेनंतरच जोडपी येतात. त्यानंतर त्यांना गरजेनुसार औषधे दिली जातात.
- डॉ. अलका क्षीरसागर, अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल संघटना
राज्य शासनाने कितीही योजना राबविल्या, तरी स्त्रियांमध्ये रक्तक्षयाविषयी अद्यापही जनजागृती झालेली नाही. आम्ही विविध मोहिमांमार्फत तालुका आणि गावस्तरावर औषधवाटप करतो. तसेच, गर्भवती स्त्रियांची चाचणी केली जाते. त्यांना प्रसूतिकाळात औषधे दिली जातात. मात्र, अनेकदा महिला गांभीर्याने वेळच्या वेळी औषधे घेत नाहीत. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत जाते.
संदीप सांगळे
अतिरिक्त संचालक, महिला व बालकल्याण विभागp kl
ससूनसारख्या रुग्णालयात दारिद्र्यरेषेखालील गर्भवती स्त्रिया उपचारांसाठी येतात. यामध्ये तब्बल ८० ते ९० टक्के स्त्रियांना रक्तक्षय झालेला असतो. गरिबी, दारिद्र्य, सकस आहाराचा अभाव, निरक्षरता ही त्यामागील कारणे आहेत.
- डॉ. उमा वानखेडे, माजी प्रसूती विभागप्रमुख, ससून रुग्णालय
