scorecardresearch

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

मानधन वाढीसह इतर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही ते पूर्ण करण्यात न आल्याने अंगणवाडी सेविकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर संताप मोर्चा काढला.

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर बुधवारी ठिय्या आंदोलन केले.

पुणे : मानधन वाढीसह इतर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही ते पूर्ण करण्यात न आल्याने अंगणवाडी सेविकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर संताप मोर्चा काढला. फेब्रुवारी महिन्यात विविध मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही राज्य शासनाने दिली होती. मात्र, राज्य सरकारने अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीबाबत काहीच निर्णय घेतला नाही. गेल्या चार वर्षांपासून मानधन वाढ झाली नसल्याने हा मोर्चा काढण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या दिला होता. गॅस, इंधनासह सर्वच स्तरावर महागई वाढली आहे. सरकाने मानधनवाढीचे दिलेले आश्वासन पाळले नाही. करोना काळात अंगणवाडी सेविकांनी पुढे येऊन काम केले. त्यांच्या मानधन वाढीचा विचार सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणे अपेक्षित होते. यापूर्वी दिलेल्या मोबाइलमध्ये केंद्राने पोषण ट्रॅक अ‍ॅपची भाषा इंग्रजी केली. ती मराठी असणे आवश्यक होते. इंग्रजीत असल्याने महिलांना त्यामध्ये माहिती भरताना अडचणी येत आहेत, असे अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रच्या राज्य सचिव शुभा शमीन यांनी सांगितले.

पुणे जिल्हा सचिव रजनी पिसाळ, इंदापूर तालुका अध्यक्ष बकुळा शेंडे, सुवर्णा शितोळे आदी उपस्थित होत्या.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anganwadi workers march zilla parishad various demands state government amy

ताज्या बातम्या