तातडीच्या व गंभीर प्रसंगी अत्यावश्यक ठरणाऱ्या रुग्णवाहिकेच्या भाडय़ाचा विषय अद्यापही कागदावरच राहिला आहे. अनेकदा रुग्णाच्या नातलगांकडून मनमानी पद्धतीने भाडय़ाची वसुली केली जाते, मात्र प्रसंग दु:खद असल्याने कोणताही वाद न घालता मागेल ते भाडे दिले जाते व त्याची वाच्यताही केली जात नाही. त्यामुळे रुग्णलाहिका चालकांचेही फावते. अशा गोष्टी होऊ नयेत, यासाठी  तीन वर्षांपूर्वी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रुग्णवाहिकांसाठीही भाडेपत्रक ठरवून दिले. मात्र, त्याची कुठेच अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते आहे.
कुठलाही प्रसंग सांगून येत नसल्याने कुणालाही व कधीही रुग्णवाहिकेची गरज लागू शकते. अशा तातडीच्या वेळी रुग्णवाहिकेची सेवा घेतल्यास अगदी कमी अंतरापर्यंतही काही हजार रुपये उकळले जात असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. रुग्णाला तातडीने रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकेची त्या वेळी गरज असल्याने रुग्णालयाचे नातलगही मागेल ते भाडे देतात. त्याचप्रमाणे या गोष्टीची कुठे तक्रारही केली जात नाही. याचाच फायदा काही रुग्णवाहिका चालकांकडून घेतला जातो व मनाला वाटेल ते भाडे रुग्णांच्या नातलगांकडून घेतले जाते.
रुग्णांच्या नातलगांची होणाऱ्या लुटीबाबत सजग नागरिक मंचच्या वतीने काही वर्षांपूर्वी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे लक्ष वेधले होते. रुग्णवाहिका चालकांकडून केल्या जाणाऱ्या लुटीबाबतचे काही उदाहरणेही मांडण्यात आली होती. शहरात धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचे भाडे प्राधिकरण ठरविते. त्याप्रमाणे रुग्णवाहिकेचे दरपत्रकही ठरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्राधिकरणाने रुग्णवाहिकांच्या सेवेचा अभ्यास केला व त्यानंतर झालेल्या बैठकीत २१ ऑगस्ट २०१३ रोजी रुग्णवाहिकांसाठी भाडेपत्रक जाहीर केले.
प्राधिकरणाने पुढाकार घेऊन रुग्णवाहिकांसाठी भाडेपत्रक जाहीर केले. मात्र त्याची काटोकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्याचप्रमाणे परिवहन विभागानेही या भाडेपत्रकाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रुग्णवाहिकांच्या भाडेपत्रकाला डावलून बहुतांश रुग्णवाहिकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते. रुग्णवाहिकेचे ठरवून दिलेले भाडेपत्रक रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, सद्य:स्थितीत असे कोणतेही भाडेपत्रक कोणत्याही रुग्णालयाच्या दर्शनी भागात दिसून येत नाही. त्यामुळे केवळ भाडेपत्रक जाहीर करून काहीही उपयोग होऊ शकला नसल्याने रुग्णांच्या नातलगांची लुबाडणूक सुरूच आहे.

रुग्णवाहिकांचे दरपत्रक

– रुग्णवाहिकेचा प्रकार—— २५ किमी किंवा दोन तासांकरिता भाडे—– प्रती किमी भाडे
मारुती व्हॅन————२५० रुपये————————९ रुपये
– टाटा सुमो व मॅटॅडोर——-३०० रुपये———————–१० रुपये
– टाटा ४०७, स्वराज माझदा—५०० रुपये————————१२ रुपये
– आयसीयु व वातानुकूलित—७०० रुपये————————२० रुपये