पुणे : पशुसंवर्धन विभागाने पशुधनामध्ये पावसाळ्यात येणाऱ्या रोगांच्या विविध साथींना अटकाव करण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच लसीकरणाचे नियोजन केले होते. राज्यातील तब्बल ९५ टक्के जनावरांचे लसीकरण पावसाळ्यापूर्वीच पूर्ण केल्यामुळे यंदाचा पावसाळ्यात पशुधनामध्ये कोणत्याही रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव अथवा संसर्ग झाल्याचे दिसून येत नाही. राज्यात २०२२ मध्ये ३५ जिल्ह्यांमधील सुमारे ४० हजार संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ३,५०,१७१ बाधित पशुधनापैकी एकूण २,६७,२२४ पशुधनावर उपचार करावे लागले होते, तर २४,४३० पशुधनाचा मृत्यू झाला होता. लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या ११,२१४ पशुपालकांना नुकसान भरपाईपोटी सुमारे ३० कोटी रुपये द्यावे लागले होते. हेही वाचा >>> कोलकत्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मोठी मागणी या घटनेपासून धडा घेत तत्कालीन पशुसंवर्धन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एखाद्या रोगाची साथ आल्यावर उपाययोजना करण्याऐवजी साथ येऊ नये, यासाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी अतिरिक्त निधी, औषधे, लसींच्या मात्रा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच लम्पी चर्म रोगासह, लाळ्या खुरकुत, घटसर्प, फऱ्या, ब्रुसेल्लोसीस, ॲथ्रॅक्स, क्लासिकल स्वाइन फीवर, आंत्रविषार, पीपीआर, देवी, मानमोडी इत्यादी महत्त्वाच्या रोगांची साथ टाळण्यासाठी सुमारे ९५ टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले होते. त्यात म्हैसवर्गीय, गोवर्गीय पशूंसह शेळ्या - मेंढ्यांचा समावेश आहे. हेही वाचा >>> डेंग्यू, झिकापासून आता बचाव! भारतात लस विकसित; दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यास मंजुरी असे झाले लसीकरण लाळ्या खुरकुत रोगाची साथ टाळण्यासाठी १,८६,०८,०३० (९५ टक्के) गाई आणि म्हशींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शेळ्या-मेंढ्यांतील अतिसंसर्गजन्य पीपीआर रोग टाळण्यासाठी १,०५,४०,६८१ (९० टक्के) शेळ्या - मेंढ्याचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गोवंशातील लम्पी चर्मरोग टाळण्यासाठी १,०७,५२,९६८ (८१ टक्के) गोवंशाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ब्रूसेल्लोसीस नियंत्रणासाठी लसीकरणाची पहिली फेरी सुरू आहे. गोवर्गीय (४ ते ८ महिन्यांची वासरे, कालवडी) २१,०५,३५१ पशूंचे (६८.९० टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. आंत्रविषार पशुरोग नियंत्रणासाठी ४०,३३,०२६ (पात्र पशुधनाच्या ९० टक्के) शेळ्या व मेंढ्यांमध्ये लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच एचएस बीक्यू, एचएस, बीक्यू या महत्त्वाच्या पशुरोगांच्या नियंत्रणासाठी १,०२,०४,९२३ (९२ टक्के) गाई व म्हैसवर्गीय पशूंमध्ये लसीकरण पूर्ण झाले आहे. शिवाय १६ ऑगस्टपासून राज्यभरात लाळ्या खुरकुत लसीकरणाच्या पाचव्या फेरीस सुरुवात होत आहे. सर्व गाई व म्हशींना लसीकरणपूर्व जंतनाशक औषध दिले जात आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त देवेंद्र जाधव यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी आलेल्या लम्पी चर्मरोगाच्या साथीमुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले होते. यंदा पावसाळ्यापूर्वीच युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवून ९५ टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. त्यामुळे लम्पीसह अन्य रोगांच्या साथी टाळता आल्या. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे मोठे नुकसान टाळण्यात यश आले. - कौस्तुभ दिवेगावकर, आयुक्त, पशुसंवर्धन